मुंबई शहरातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असून शिवडी परिसरात जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे २२ आणि २३ एप्रिलदरम्यान तब्बल १८ तास पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जलपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेण्यात आले असून या कामाचा परिणाम दक्षिण आणि मध्य मुंबईतील अनेक भागांवर होणार आहे.

२२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून २३ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शिवडीतील हाजी बंदर मार्गावर १५०० मिमी व्यासाचे दोन नवीन बटरफ्लाय व्हॉल्व बसवण्याचे काम होणार असल्याने मुख्य जलविभाजक बंद ठेवावा लागणार आहे.( water) यामुळे ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘ई’ आणि ‘एफ-दक्षिण’ या पाच विभागांतील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.
दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या प्रशासकीय आणि व्यावसायिक भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर, पी. डिमेलो मार्ग, सेंट जॉर्ज रुग्णालय, रिझर्व्ह बँक परिसर आणि नौदल डॉकयार्ड या भागांना याचा फटका बसणार आहे. ‘बी’ विभागातील उमरखाडी, वाडी बंदर, दाणा बंदर तसेच गुरुवारी पहाटे महम्मद अली रोड आणि मशीद बंदर परिसरातही पाणीपुरवठा खंडित राहील.
‘सी’ विभागातील बोरा बाजार, सरदार वल्लभभाई पटेल रोड आणि आसपासच्या व्यापारी भागांमध्ये गुरुवारी पहाटे पाणीपुरवठा बंद असेल. ‘ई’ विभागात माझगाव, काळाचौकी, नागपाडा, मदनपुरा, कामाठीपुरा आणि आग्रीपाडा परिसरात बुधवारी पूर्णपणे पाणी बंद राहणार असून गुरुवारी काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. विशेष म्हणजे भायखळा परिसरातील रुग्णालयांना देखील कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. (water) मध्य मुंबईतील ‘एफ-दक्षिण’ विभागात शिवडी, वडाळा पूर्व, परळ गाव आणि अभ्युदयनगर येथे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील, तर लालबाग, दादर आणि हिंदमाता भागात कमी दाबाने पाणी मिळेल. केईएम रुग्णालय, टाटा रुग्णालय आणि वाडिया रुग्णालय यांसारख्या महत्त्वाच्या रुग्णालयांनाही या पाणी कपातीचा फटका बसणार आहे.
ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा खंडित होणार असल्याने नागरिकांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले (water) असून पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर काही दिवस पाणी उकळून व गाळून वापरण्याचा सल्ला दिला आहे. या दुरुस्तीमुळे काही दिवस गैरसोय होणार असली तरी भविष्यातील जलपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी हे काम आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा
आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार