कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
घटना दुरुस्तीसह तीन विधेयके (special)मंजूर करवून घेण्यासाठी संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. मात्र घटना दुरुस्ती विधेयक दोन तृतीयांश मते पडली नाहीत म्हणून फेटाळण्यात आले. परिणामी इतर दोन विधेयके मागे घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा पराभव झाला. या पराभवाला भ्रूणहत्या म्हटले गेले तर विरोधकांच्या कडून गोहत्या संबोधले गेले.

खरे तर संसदेत “भाषा सभ्यतेची” (special)अनेकांनी हत्या केली असे म्हटले तर ते अतिशयोक्त होणार नाही. महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे विधेयक 2023 मध्येच पारित झाले आहे. पण दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात मतदार संघाच्या पुनर्रचनेसह हे विधेयक पुन्हा मांडण्यात आले. आणि अर्थात ते फेटाळले गेले. ही मुद्दाम घडवून आणलेली चूक होती. आणि त्या मागे एक पद्धतशीर राजकीय गणित होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेली इंडिया आघाडी ही मजबूत आहे का?, आघाडीत फूट पडेल काय?, एनडीएतील घटक पक्ष आपल्याबरोबर आहेत का?, या सर्व प्रश्नांची उत्तरे घटना दुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून मिळवायची होती. अर्थात विधेयक फेटाळले गेले तरी त्याचा राजकीय फायदा नंतर कसा करवून घ्यायचा याचा सुद्धा आधीच विचार झालेला होता.
आणि त्याप्रमाणे आता घडत आहे.(special) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जणू काही हे विधेयक फेटाळल्यामुळे देश संकटात आला आहे अशा अविर्भावात देशाला शनिवारी रात्री संबोधित केले. काँग्रेस पक्षासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी या विधेयकाची भ्रूणहत्या केली असा घनाघात मोदी यांनी आपल्या भाषणात केला आहे. हे विधेयक फेटाळल्यामुळे त्याची सजा विरोधकांना भोगावी लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. पुढील महिन्यात होत असलेल्या पश्चिम बंगालसह इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फेटाळल्या गेलेल्या विधेयकाचा फायदा होईल. अशी अटकळ भाजपच्या नेत्यांनी बांधलेली आहे. नेमके काय घडणार आहे ते निकालानंतर स्पष्ट होईलच.
त्यामुळे एकूणच हे विधेयक (special)फेटाळले गेल्याबद्दल भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष आनंद झालेला आहे, पण तसा तो चेहऱ्यावरून दाखवता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदेत पराभव करता येतो हे इंडिया आघाडीने दाखवून दिले आहे. इंडिया आघाडीच्या एकजुटीमुळेघटना दुरुस्ती विधेयक फेटाळले या आनंदापेक्षा नरेंद्र मोदींचा खऱ्या अर्थाने पराभव झाल्याबद्दल इंडिया आघाडीच्या नेत्यांना आनंद झाला आहे आणि त्यांनी तो संसदेमध्ये व्यक्तही केला आहे.”एक बिल के टुकडेहजार हुए! कोई यहा गिरा कोई वहां गिरा”हे दुःख व्यक्त करणाऱ्या भाजपाला आपला आनंद व्यक्त करता येत नाही इतकेच. कारण भाजपचे नेते या पराभवातच यशाचे समीकरण बनवताना दिसत आहेत.
सत्तेसाठी काय पण अशी (special)अवस्था सध्या भाजपची झालेली दिसते. महिलांना 33 टक्के आरक्षण हे विधेयक पूर्वीच मंजूर झालेले आहे. पण ते पुन्हा घटना दुरुस्तीला जोडून मांडण्यात आले. संसदेमध्ये आपणाला साधे बहुमत आहे. आणि घटना दुरुस्तीसाठी दोन तृतीयांश मते लागतात हे माहीत असूनही नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व असलेल्या एनडीए सरकारने ते संसदेत मांडले. त्यासाठी दोन दिवसांचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. त्यावर करोडो रुपयांचा खर्च झाला. विधेयक मंजूर झाले तर फार मोठा विजय झाला आणि विधेयक ना मंजूर झाले तरी फायदाच होईल असे डावपेच या विधेयकामागे होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांनी घटना दुरुस्तीचे विधेयक फेटाळले गेल्यानंतर संसदेमध्ये जो जल्लोष केला तो विधेयक नाकारले गेल्याचा नव्हता तर नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील पराभवाबद्दलचा होता हे दडून राहिलेले नाही. विधेयक गेले खड्ड्यात मोदींचा पराभव झाला ना !हेच इंडिया आघाडी साठी महत्त्वाचे होते.
आता भाजपच्या महिला (special)आघाडी कडून हे विधेयक नाकारले गेल्याबद्दल इंडिया आघाडीला दोषी ठरवून देशभर आंदोलन केले जाईल. पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांचा काँग्रेसने व इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी अपमान केला आहे असे आता रस्त्यावर उतरून सांगितले जाईल. या विधेयकाच्या निमित्ताने एन डी ए मजबूत आहे. घटक पक्ष भाजपशी प्रामाणिक आहेत, हे जसे स्पष्ट झाले तसेच नितेश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे वेगळा विचार करणार नाहीत हेसुद्धा स्पष्ट झाले आहे. एकूणच राजकीय हेतूने, राजकीय गणिते मांडून दोन दिवसांचे संसदेचे अधिवेशन बोलवण्यात आले होते आणि त्यासाठी सर्वसामान्य जनतेचा कररुपाने मिळणारा पैसा उधळला गेला एवढे म्हणावे लागेल.