‘रात्रीस खेळ चाले…’ :रेस्ट हाऊसमध्ये सापडले घबाड!

धुळे येथील शासकीय विभागांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या आमदारांच्या समितीतील सदस्यांना देण्यासाठी गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत साडे पाच कोटी रुपये ठेवल्याचा आरोप धुळ्याचे माजी आमदार तथा उद्धव सेनेचे नेते अनिल गोटे यांनी केल्यानंतर रात्री उशीरा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या एक कमिटीने या रुमचे कुलूप तोडून इन कॅमेरा तपासणी केली.

रुममध्ये नोटा मोजण्याचे मशिन देखील नेण्यात आले होते. एक तासहून अधिक वेळ रुममध्ये सापडलेल्या नोटांची मोजणी सुरू होती, असे समजते. मात्र, रुममधून कुणीही बाहेर न आल्याने यासंदर्भात दुजोरा मिळालेला नाही.

धुळ्यात समितीचे ११ आमदार दाखल झाले आहेत. या समितीत सहभागी असलेल्या आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी साडे पाच कोटी रुपये गोळा केले असून ते विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत ठेवले आहेत असा आरोप बंद खोलीबाहेर ठिय्या मांडून बसलेल्या माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसार माध्यमासमोर केला होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास प्रातांधिकारी रोहन कुवर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर. आर. पाटील, उद्धव सेनेचे नरेंद्र परदेशी आणि कॅमेरामन माळी अशा पाच लोकांच्या कमिटीने रुमचे कुलूप तोडून इन कॅमेरा तपासणी सुरु केली. काही वेळानंतर रुममध्ये नोटा मोजण्याचे मशिन नेण्यात आले. एक तासापेक्षा अधिक काळापासून रुममध्ये सापडलेल्या नोटांची मोजणी सुरू होती, असे समजते.