कारखानदारात कारखाने लवकर सुरू करण्यामागे ईडी आणि सीबीआयच्या कारवाईची भीती आहे. सरकारच्या दबावाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठीच कारखानदार धुराडी पेटवण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
कडेगाव येथे जयसिंगपूर येथे १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या २५ वी ऊस परिषद निमित्त आयोजित बैठकीत राजू शेट्टी बोलत होते. (Raju Shetty) यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, पाणी संघर्ष समितीचे प्रमुख डी एस देशमुख, ज्येष्ठ नेते युनुस पटेल, संतोष डांगे, संजय तडसर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात आज आठ टक्क्यांपेक्षा जास्त साखर उतारा देणारा ऊस उपलब्ध नाही. १२ ते १३ टक्के उतारा अपेक्षित असताना केवळ आठ टक्के उताऱ्याचा अपरिपक्व ऊस गाळल्यास रिकव्हरी आणि वजन घटून शेतकऱ्यांचे एकरी मोठे नुकसान होणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर जानेवारीमध्ये उतारा चांगला मिळतो. (Raju Shetty) त्यामुळे गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतरच सुरू झाला पाहिजे.
मात्र, केंद्र सरकार सणासुदीच्या काळात बाजारात नवीन साखर आणून साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी कारखानदारांवर दबाव आणत आहे, शेतकरी आणि कारखानदारांनी तोटा सहन करायचा आणि केंद्राने बाजारासाठी साखर उपलब्ध करून घ्यायची हे मान्य नाही. शेट्टी यांनी आरोप केला की अनेक साखर कारखानदारांवर ईडी सीबीआयच्या चौकशा सुरू आहेत. त्या चौकशांपासून वाचण्यासाठी आणि सरकारला खूश ठेवण्यासाठी सरकारधार्जिणे कारखानदार आंदोलन मोडीत काढण्यासाठी आगाऊपणा करून कारखाने सुरू करत आहेत. ऊस दराचा तिढा सुटत नाही तोपर्यंत काटा बंद आंदोलन छेडले जाईल. वेळप्रसंगी रस्त्यावर गाड्या अडवू. रोक सको तो रोक लो, पण धुराडे बंद पाडल्याशिवाय सोडणार नाही. कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी स्वाभिमानीचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा, पाणी संघर्ष समितीचे प्रमुख डी. एस. देशमुख, अनिल जरग, भाऊसाहेब यादव यांनी मनोगते व्यक्त केली. (Raju Shetty) यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, इम्रान पटेल, शशिकांत रासकर, जीवन करकते, वसंत इनामदार, अशोक पवार, रामदास महिंद , बजरंग अडसूळ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा :
तेरवाड येथे भरधाव डंपरची तीन दुचाकींना धडक तिघांचा मृत्यू , चौघे गंभीर