मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर दोन दिवस वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. डोंगरगाव आणि कुसगाव परिसरातील एका नवीन पुलाच्या रंगकामासाठी आणि शटरिंग काढण्याच्या तांत्रिक प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. या तांत्रिक कामामुळे महामार्गावरील वाहतूक काही ठराविक तासांसाठी पूर्णपणे थांबवली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२३ एप्रिल) आणि शुक्रवारी (२४ एप्रिल) या दोन दिवसांत दुपारी १२ ते ३ या वेळेत महामार्गावर कामे केली जातील. किमी ५८/५०० जवळ पुलाचे काम सुरू असल्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून हा तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई आणि पुण्याकडे जाणारी अवजड व हलकी वाहने महामार्गावर थांबवून ती पर्यायी रस्त्यांकडे वळवली जाणार आहेत.

२३ एप्रिल रोजी मुंबईकडे जाणारी मार्गिका बंद असेल, तर २४ एप्रिल रोजी पुण्याकडे येणारी वाहतूक रोखली जाईल. प्रवाशांना कोणताही अडथळा येऊ नये (Mumbai-Pune )म्हणून महामंडळाने आगाऊ सूचना दिली असून, या कामामुळे प्रवासाचा वेळ वाढण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्याप्रमाणे करावे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गुरुवारी दुपारी मुंबईकडे जाणारी वाहने किवळे आणि देहूरोड मार्गे तळेगाववरून राष्ट्रीय महामार्ग ४८ वर वळवून पुन्हा कुसगाव टोल नाक्यावरून मुख्य मार्गावर येतील. (Mumbai-Pune )तसेच, शुक्रवारी पुण्याकडे येणारी वाहतूक कुसगाव टोल प्लाझावरून जुन्या हायवेवर वळवली जाईल आणि पुन्हा किवळेमार्गे पुण्यात प्रवेश करेल. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा जास्तीत जास्त वापर करावा.

या ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांना कोणतीही आपत्कालीन मदत हवी असल्यास, (Mumbai-Pune )प्रशासनाने ९८२२४९८२२४ हा नियंत्रण कक्षाचा क्रमांक आणि ९८३३४९८३३४ हा महामार्ग पोलिसांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी किंवा मदतीसाठी या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय