मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा भारतातील ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत (energy) असल्याचे चित्र अधिक स्पष्ट होत आहे. विशेषतः स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर त्याचा परिणाम दिसून येत असून, सरकारी तेल कंपन्यांनी नवीन एलपीजी कनेक्शन देण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून हा निर्णय अमलात असून, परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच ही सेवा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.

भारत आपल्या एलपीजी गरजेपैकी मोठा हिस्सा आयातीद्वारे पूर्ण करतो. देशात दरवर्षी सुमारे 33 दशलक्ष टन एलपीजीचा वापर होतो आणि त्यातील जवळपास 65 टक्के गॅस परदेशातून आयात केला जातो. या आयातीचा मोठा भाग पश्चिम आशियाई देशांकडून येतो. त्यामुळे त्या भागातील कोणतीही अस्थिरता थेट भारताच्या पुरवठा साखळीवर परिणाम घडवते.
सध्या इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे होर्मुझची सामुद्रधुनी या महत्त्वाच्या जलमार्गातून होणाऱ्या तेल आणि गॅस वाहतुकीवर दबाव निर्माण झाला आहे. जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही सामुद्रधुनी सध्या तणावाच्या केंद्रस्थानी आहे. परिणामी, जहाजांची ये-जा विस्कळीत होण्याची शक्यता वाढली असून, त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत आहे.
या पार्श्वभूमीवर देशातील तेल कंपन्यांनी विद्यमान ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला आहे. ज्या ग्राहकांकडे आधीपासून एलपीजी कनेक्शन आहे, त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळेच नवीन कनेक्शन देण्यावर तात्पुरती मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे नवीन घरात स्थलांतर करणारे किंवा पहिल्यांदाच गॅस कनेक्शन घेऊ इच्छिणारे नागरिक, विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबे, काही काळ प्रतीक्षेत राहण्याची शक्यता आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, पर्यायी मार्गांनी पुरवठा कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील तणाव असूनही एलपीजी, पीएनजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. सध्या कोणतीही मोठी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
परिस्थिती लवकरच स्थिर होईल आणि पुरवठा साखळी पूर्ववत झाल्यानंतर नवीन एलपीजी कनेक्शन पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत विद्यमान ग्राहकांना अखंड सेवा मिळावी, यालाच प्राधान्य दिले जात आहे.
हेही वाचा
राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचं भवितव्य ठरणार