नागपूरमध्ये आयोजित भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत त्यांनी सांगितलेल्या कथनावरून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. (controversy) याआधीच संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून प्रकाशकाला धमकी दिल्याच्या घटनेमुळे वातावरण तापलेले असताना या नव्या वक्तव्याने वादाला आणखी हवा मिळाली आहे.

या कार्यक्रमाला मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भारत, सनातन धर्म आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे कौतुक करताना अनेक विधानं केली. त्यांनी असेही म्हटले की, भारताच्या गौरवाला पुन्हा उंचीवर नेण्यासाठी संघ प्रमुखांनी मोठे योगदान दिले असून आपत्तीच्या काळात संघाचे स्वयंसेवक मदतीला धावून येतात.
मात्र सर्वाधिक चर्चा त्यांच्या त्या कथनाची होत आहे ज्यात त्यांनी शिवाजी महाराज युद्ध करताना थकले आणि त्यांनी रामदास स्वामींकडे जाऊन राज्यकारभार सोपवण्याची इच्छा व्यक्त केली, असे सांगितले. त्यांच्या मते, या प्रसंगी रामदास स्वामींनी गुरू-शिष्य नात्याचा दाखला देत महाराजांनाच पुन्हा राज्यकारभार सांभाळण्यास सांगितले. या कथनावरून इतिहासाशी विसंगत असल्याच्या टीका सुरू झाल्या आहेत.
याशिवाय, “चार मुलं जन्माला घाला आणि त्यातील एक स्वयंसेवक संघाला द्या,” असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या या विधानांमुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चर्चेला उधाण आले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणावर अधिक प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
आप पक्षाला मोठा धक्का राघव चड्ढासह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश
ऐकायला कमी येतंय, आहारात या पदार्थांचा समावेश करा दिसून येईल फरक
27 एप्रिलला सर्वात दुर्मिळ योग, 3 लकी राशींचं नशीब फळफळणार, पैशांचा पाऊस पडणार?