मोठी बातमी! भाजपाची विधानपरिषद निवडणुकीसाठी यादी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी, धक्कातंत्राचा वापर

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करत पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला आहे. (elections) अनेक दिग्गज नेत्यांकडून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असताना पक्षाने अनुभवी आणि संघटनात्मक पातळीवर काम केलेल्या नव्या चेहऱ्यांना संधी देत राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली आहे.

भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सातव यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याचे मानले जात आहे.

या यादीत विवेक कोल्हे यांचे नाव विशेष चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान स्नेहलता कोल्हे यांना भविष्यात योग्य सन्मान दिला जाईल, असा शब्द पक्षश्रेष्ठींनी दिला होता. त्यानुसार त्यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

कोकणातील प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या प्रमोद जठार यांनाही भाजपने संधी दिली आहे. ठाण्यातील माधवी नाईक या अनेक वर्षांपासून भाजप संघटनेत सक्रिय असून महिलांचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. संजय भेंडे यांनाही पक्षनिष्ठेचे फळ मिळाल्याची चर्चा आहे. तसेच सुनील कर्जतकर यांनाही संघ परिवाराशी जवळीक असलेला चेहरा म्हणून संधी देण्यात आली आहे.

भाजपच्या या यादीत विभागीय संतुलन साधण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. मराठवाड्यातून सुनील कर्जतकर, कोकणातून प्रमोद जठार आणि माधवी नाईक, विदर्भातून संजय भेंडे तर उत्तर महाराष्ट्रातून विवेक कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. मात्र मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राला या यादीत स्थान मिळाले नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, कार्यकाळ संपत असलेल्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी न देता भाजपने नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवला आहे. संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांसारख्या नेत्यांना यावेळी संधी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाने संघटनेतील कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन करत पुढील निवडणुकांसाठी नवे समीकरण तयार करण्यास सुरुवात केल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा

अरविंद केजरीवाल यांचा …….न्यायासाठी सत्याग्रह ‌?.

पोलादी सुरक्षा व्यवस्था …..जेव्हा भेदली जाते…

‘राजा शिवाजी’मधील लहान मुलाच्या त्या सीनवर कात्री सेन्सॉर बोर्डाने सुचवले हे मोठे बदल