उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक जण कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे फिरायला जातात. मात्र याच दिवसांत समुद्रकिनाऱ्यांवर काही अनोखे बदल दिसून येत असल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. (Konkan) काही ठिकाणी समुद्राचे पाणी अचानक मागे सरकलेले दिसत आहे, तर काही किनाऱ्यांवर मोठमोठे वाळूचे ढिगारे आणि खड्डे तयार झाले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोंडवळी समुद्रकिनाऱ्यावर सध्या वाळूचे प्रचंड ढिगारे निर्माण झाले आहेत. किनाऱ्याचा भूभाग बदलल्यासारखा दिसत असून काही ठिकाणी खोल खड्डेही पडू लागले आहेत. त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना वेगळेच दृश्य पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे गुजरातमधील सुरत येथील प्रसिद्ध डुमास बीचवर समुद्राचे पाणी अचानक मोठ्या प्रमाणात मागे सरकल्याची घटना समोर आली आहे. समुद्राचे पाणी तब्बल हजार फूटांहून अधिक अंतरावर मागे गेल्याने किनाऱ्यावर आलेले पर्यटक आश्चर्यचकित झाले. काही वेळापूर्वी पाण्याखाली असलेला भाग अचानक उघडा पडल्याने अनेकांनी या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.
तज्ज्ञांच्या मते, अशा घटना निसर्गातील सामान्य प्रक्रियेचा भाग आहेत. बदलते हवामान, मान्सूनपूर्व वाऱ्यांचा वेग, भरती-ओहोटीचे चक्र आणि समुद्रतळातील नैसर्गिक हालचाली यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक बदल दिसू शकतो. त्यामुळे या घटना कोणत्याही मोठ्या संकटाचे संकेत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेषतः सोशल मीडियावर या प्रकारांना सुनामी किंवा इतर आपत्तीशी जोडून अफवा पसरवल्या जातात. मात्र तज्ज्ञांनी नागरिकांना आणि पर्यटकांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. समुद्रकिनाऱ्यांवर फिरताना सुरक्षितता पाळावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?