मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. राज्यभरातील अनेक महिलांमध्ये हा हप्ता नेमका कधी जमा होणार, (installments) याबाबत उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, योजनेतील अनेक महिलांचे लाभ थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे.

योजनेअंतर्गत लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. या मुदतीपूर्वी ज्यांनी प्रक्रिया पूर्ण केली, त्यांचाच लाभ सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच, ई-केवायसी करताना झालेल्या चुका दुरुस्त केलेल्या लाभार्थींनाच पुढील हप्ते मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पात्र असूनही अनेक महिलांचे हप्ते थांबले आहेत. यामुळे लाभ कायमचा बंद होण्याची भीती निर्माण झाली असून, महिलांनी मुदतवाढ द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे अर्ज करून एक संधी देण्याची विनंती करण्यात आली आहे.
या संदर्भात १५ किंवा १६ मे रोजी महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त, उपायुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अविनाश मगर यांनी सांगितले की, अनेक महिलांची ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतूनही अशीच मागणी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे हप्ते एकत्रित स्वरूपात जमा केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता लाखो महिलांचे लक्ष आगामी बैठकीकडे लागले आहे.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?