सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लोकांचा दिवस आता स्क्रोलिंगनेच सुरू होतो आणि स्क्रोलिंगनेच संपतो. विशेषतः Instagram हे तरुणांपासून सर्व वयोगटांमध्ये लोकप्रिय अॅप बनले आहे. अशातच Instagram वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली असून Direct Messages (DMs) मधील end-to-end encryption फीचर हटवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे.

या फीचरमुळे आतापर्यंत दोन व्यक्तींमध्ये होणारे खासगी संभाषण अधिक सुरक्षित मानले जात होते. मेसेज पाठवणारा आणि प्राप्त करणारा यांच्याशिवाय इतर कुणालाही ते वाचता येत नव्हते. त्यामुळे खासगी चॅटसाठी अनेक युजर्स या सुविधेवर विश्वास ठेवत होते. मात्र आता हे संरक्षण कमी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कंपनीच्या भूमिकेनुसार, हा बदल ऑनलाइन सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी करण्यात येत आहे. विशेषतः बालकांशी संबंधित गुन्हे, grooming, harassment आणि बेकायदेशीर कंटेंट रोखण्यासाठी अधिक प्रभावी मॉनिटरिंगची गरज असल्याचे सांगितले जात आहे. अनेक देशांतील सरकारांनी टेक कंपन्यांवर सुरक्षिततेसंदर्भात कडक भूमिका घेतल्याने अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असल्याचे मानले जाते.
सध्या हा बदल केवळ Instagram प्लॅटफॉर्मपुरता मर्यादित असल्याचे समजते. WhatsApp किंवा Facebook Messenger वर अशाच प्रकारचे बदल होणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र डिजिटल जगात सुरक्षेचे नियम अधिक कठोर होत असल्याने पुढील काळात सोशल मीडिया कंपन्यांच्या privacy policies मध्ये आणखी मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
या घडामोडीनंतर अनेक युजर्समध्ये खासगीपणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, तर काही जण ऑनलाइन सुरक्षिततेसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे प्रायव्हसी आणि सुरक्षा यामधील समतोल कसा साधला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?