सांगली शहरातील रस्ते विकासकामांच्या रखडपट्टीमुळे नागरिक, वाहनधारक आणि वाहतूकदारांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या शहराची अवस्था सध्या उकरलेल्या आणि अपूर्ण रस्त्यांच्या नगरीसारखी झाली असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. शहरातील महत्त्वाचे रस्ते अनेक महिन्यांपासून खोदून ठेवलेले आहेत, (Sangli) तर काही उड्डाणपूलांचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे. परिणामी संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि दैनंदिन हालअपेष्टा वाढल्या आहेत.

Maharashtra राज्य महामार्गावरील विटा ते सांगली मार्गाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू असले तरी पूर्णत्वास जाताना दिसत नाही. माधवनगर, बुधगाव, कवलापूर ते कुमठे फाटा या परिसरात रस्त्याची मोठ्या प्रमाणावर उकराउकरी करण्यात आली आहे. (Sangli) अनेक ठिकाणी वाहतूक एकाच बाजूने सुरू असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ॲम्ब्युलन्सलाही मार्ग काढणे कठीण होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.साखर कारखाना परिसरापासून कॉलेज कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे टप्प्याटप्प्याने काम सुरू असले तरी प्रत्यक्षात संपूर्ण मार्ग अर्धवट अवस्थेत आहे. दुर्गामाता मंदिराजवळ मोठा खड्डा पडल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. फुटलेल्या पाईपलाइनमुळे पाणी साचत असून वाहनधारकांना गचके खात मार्ग काढावा लागत आहे.
चिंतामणीनगर रेल्वे पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. पुलाचे उद्घाटन होण्यापूर्वीच काही ठिकाणी खड्डे पडल्याची चर्चा आहे. पुलावर पुरेशा प्रकाशयोजनेचाही अभाव असल्याने रात्रीच्या वेळी धोका वाढत आहे. दुसरीकडे पंचशीलनगर उड्डाणपुलाचे कामही दीड ते दोन वर्षांपासून संथगतीने सुरू असून ते लवकर पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसत आहे.शिवशंभो चौकातून शहरात येणारा कर्नाळ रस्ता पुलाच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला आहे. (Sangli) त्यामुळे या मार्गावरील मोठी वाहतूक इतर अरुंद रस्त्यांवर वळवण्यात आली असून शहरातील कोंडी अधिक तीव्र झाली आहे. सांगली-कोल्हापूर मार्गाच्या रुंदीकरणाचे कामही मंद गतीने सुरू असून काही ठिकाणी रस्ता अपघातप्रवण बनला आहे.
नागरिकांचा मुख्य प्रश्न असा आहे की, दिवसभर वाहतूक सुरू असताना त्याच वेळेत खोदकाम, खडी टाकणे, जेसीबी कामे आणि इतर कामे का केली जातात? रात्रीच्या वेळी कामे करून ती युद्धपातळीवर पूर्ण का केली जात नाहीत, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.शहरातील वाढत्या समस्येमुळे आता नागरिक, व्यापारी आणि वाहतूकदार संघटना रस्त्यांसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रखडलेली कामे पूर्ण करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?