कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
प्रख्यात संगीतकार नौशाद (reached)म्हणायचे की, पाश्चात्त्य संगीतावर शरीर डोलते मात्र हिंदुस्थानी संगीतावर आत्मा डोलतो. संगीतकारांनी बांधलेल्या सुरेल सुरावटीलारसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचे काम गायकाला, गायिकेला करावे लागते. हे काम भारतीय संगीत प्रांतातील अनेक दिग्गज आणि केले आहे आणि त्यामध्ये मंगेशकर कुटुंबीयांचे सर्वाधिक योगदान आहे. या कुटुंबातील कंठ स्वरमणी, कंठ गांधार भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्याच भगिनी श्रमती आशा भोसले यांनी रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

शास्त्रीय संगीतापासून पॉप (reached)संगीतापर्यंतचा एक सुरमयी प्रवास त्यांच्या निधनाने कायमस्वरूपी संपला आहे. त्या स्वतःला कोल्हापूरची माहेरवाशिन समजायच्या आणि म्हणूनच कोल्हापूरने आपली सूर्यकन्या गमावली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. दीनानाथ मंगेशकर हे प्रख्यात शास्त्रीय गायक. लता मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना खडीकर, आशा भोसले आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सुर संस्कार झालेली अपत्ये होत. एकाच घरात ईश्वराने “गोड गळा” देण्याचे तसे हे दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल.
या बहिण भावंडांनी स्वातंत्र्यवीर (reached)विनायक दामोदर सावरकर यांचे “जयोस्तुते”हे एकत्रित गायलेले अंगावर रोमांच उभा करणारे गाणे कोण विसरेल? तसे हे मंगेशकर घराणे मूळचे सांगलीचे. पण दिनानाथांनी कोल्हापूरला बिऱ्हाड केले. अगदी सुरुवातीला चित्र महर्षी बाबुराव पेंटर यांच्या घरी हे कुटुंब राहत होते. बाबुराव पेंटर यांच्या कन्या श्रीमती विजयमाला पेंटर आणि श्रीमती आशा पेंटर यांनी आशा भोसले आणि एकूणच मंगेशकर कुटुंबीय यांच्या आठवणी एका माध्यमाशी बोलताना जागवल्या आहेत.
आशा भोसले यांचे प्राथमिक (reached) शिक्षण भक्ती सेवा शिक्षण संस्थेच्या अंबाबाई मंदिर नजीकच्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये झाले. त्या या शाळेत आठ वर्षे होत्या. कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना आशा भोसले यांनी कोल्हापूर हे माझे माहेर आहे असे म्हटले होते. आशा भोसले यांनी ९३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तब्बल आठ दशके त्यांचा सांगितिक प्रवास होता. जवळपास 20 भाषांमध्ये सुमारे 14 हजारगाणी त्यांनी म्हटली आहेत.त्यांच्या एकूण सांगितिक प्रवासात त्यांना काही दुःखद प्रसंगानाही सामोरे जावे लागले.
त्यांचे जेष्ठ पुत्र हेमंत भोसले, (reached)कन्या वर्षा भोसले यांचे अकाली मृत्यू त्यांना पाहावे लागले. आणखी किती माझ्या मनावर आघात करणार आहेस असा उदवेग जनक प्रश्नही त्यांनी विधात्याला विचारला होता. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला होता मात्र तो फार काळ टिकला नाही. आडनाव मात्र टिकले. आर डी बर्मन अर्थात पंचमदा यांच्याशी त्यांनी 1980 मध्ये विवाह केला होता. ओ.पी .नय्यर आणि आर डी बर्मन या दोन संगीतकारांशी त्यांचे सूर जुळले होते. या दोन संगीतकारांची सर्वाधिक गाणी आशा भोसले यांनी गायलेली आहेत.
ओ. पी .नय्यर यांनी कधी (reached)लता मंगेशकर यांचा आवाज घेतला नाही. मात्र त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जे चित्रपट निर्माण झाले त्या प्रत्येक चित्रपटात त्यांनी आशा भोसले यांचा आवाज आवर्जून घेतला होता.आशा भोसले यांच्या आवाजाची जात कुळी एकदम वेगळ्या प्रकारची होती. गीतकाराचे शब्द रसिकांच्या हृदयापर्यंत आपल्या सुरेल आवाजाने पोहोचवणाऱ्या त्या होत्या. खट्याळ, मिश्किल, दर्द, आश्वासक, मधाळ, भावगर्भ नशीला, मादक असे त्यांच्या गोड गळ्याचे वर्णन करता येईल. सी.रामचंद्र, शंकर जयकिशन, वसंत देसाई, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, ओ पी नय्यर, एस डी बर्मन,आर डी बर्मन, त्याचबरोबर सुधीर फडके, श्रीधर फडके, राम कदम, वसंत पवार अशा अनेक हिंदी आणि मराठी संगीतकारांच्या बरोबर आशा भोसले यांनी काम केले.
बर्मन पिता पुत्र, फडके पिता-पुत्र (reached)या दोन पिढ्यांबरोबर काम करणाऱ्या आशा भोसले ह्या एकमेव होत. सात वर्षांपूर्वी सुधीर गाडगीळ यांनी आशा भोसले यांची प्रकट मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांनी आयुष्याचा काय भरवसा अशा अर्थाने पुढच्या वाढदिवशी मी असेन का?असा सवाल करून श्रोत्यांना भावुक करून ठेवले होते. तेव्हा त्यांचे वय 85 होते. त्यानंतर त्यांना सात वर्षांचे आयुष्य मिळाले. गेल्याच महिन्यात सचिन तेंडुलकर यांचा चिरंजीव अर्जुन तेंडुलकर यांच्या विवाह सोहळ्याला त्या उपस्थित होत्या. सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांची ती शेवटची उपस्थिती म्हणावी लागेल.
लता मंगेशकर यांना जेवढी लोकप्रियता मिळाली तितकीच लोकप्रियता आशा भोसले यांनाही मिळाली होती. सर्व वयोगटातील मंडळींसाठी त्यांनी आपल्या आवाजाचा उपयोग केला होता. माझा आवाज माझ्या नातवापर्यंत गेला पाहिजे असे त्या म्हणत आणि म्हणूनच त्यांनी पॉप संगीतामध्येही आपले मोठे योगदान दिले होते. चित्रपटातील नायिकेचाजो मूड असेल त्याप्रमाणे त्या गात असत. अभी ना जाओ छोडकर, के जी अभी भरा नाहि, या गाण्यातील त्यांनी व्यक्त केलेले आर्जव, विनंती,आवाहन कोण विसरेल? त्याचप्रमाणे येरे घना, येरे घना, न्हाऊ घाल माझ्या मना! या गाण्यातील साद त्यांच्या गाण्याला एका उंचीवर नेऊन ठेवते.
ओ पी नय्यर यांनी त्यांच्याकडून अतिशय मादक आणि मधाळ आवाजातील गाणी गाऊन घेतली. खय्याम यांनी आशा भोसले यांच्याकडून “उमराव जान” या चित्रपटातील गाऊन घेतलेली गाणी अजरामर आहेत. आशा भोसले यांना तसे दीर्घायुष्य मिळाले. मिळालेल्या आयुष्याचे त्यांनी अक्षरशः सांगितिक सोनं केले. रसिक मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले. आशा भोसले आता अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या आहेत. पण त्यांचा आवाज मात्र अमर असून तो येथून पुढच्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करेल यात मात्र शंका नाही.