नाशिकमधील आयटी क्षेत्रात सध्या टीसीएसशी संबंधित एक गंभीर प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे. कंपनीतील काही कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप करण्यात आले असून या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. (serious case) मात्र या संपूर्ण प्रकरणातील मुख्य संशयित एचआर अधिकारी निदा खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. ती सातत्याने आपले ठिकाण बदलत असल्याने तपास यंत्रणांना तिचा माग काढणे कठीण जात आहे. दरम्यान तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात आता एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. निदा खानचा पती मोईन खान याला पोलिसांनी मुंब्रा परिसरातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, निदा खान नातेवाईकांकडे गेल्याची माहिती त्याने दिली. मात्र संबंधित नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याने आणि त्यांचे फोन बंद असल्याने पोलिसांना अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे निदाचा शोध अजूनही सुरूच आहे.
निदा खानचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाची तीन वेगवेगळी पथके काम करत आहेत. ती मुंब्रामध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला होता, परंतु त्याआधीच ती तेथून पसार झाली होती. आता तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाचीही एंट्री झाली असून तपास अधिक गंभीर वळणावर पोहोचला आहे. एटीएसने रजा मेनन आणि शफी शेख या दोघांना ताब्यात घेऊन सुमारे तीन तास चौकशी केली. या चौकशीत आंतरराष्ट्रीय कॉल्स, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य नेटवर्क याबाबत सखोल प्रश्न विचारण्यात आले. तसेच या प्रकरणाचा संबंध इतर कोणत्याही मोठ्या गुन्ह्यांशी आहे का, याचाही तपास सुरू आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करून त्यांचे क्लोनिंग केले आहे. डिजिटल पुराव्यांमधून काही संशयास्पद चॅट्स समोर आले असून व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून धर्मांतराचा कट रचला गेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ग्रुपचा वापर करून पीडितांना जाळ्यात ओढण्यात आले असावे, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. एकूणच या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असून तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. डिजिटल पुरावे आणि चौकशीतील माहितीच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
आता 100 रुपयांच्या मालावरही द्यावा लागणार टॅक्स
जास्त पगार असूनही बँक कर्ज देत नाहीये? तर ‘या’ ४ गोष्टींकडे लक्ष द्या
MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू