बिग बॉस मराठी ६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून संपूर्ण महाराष्ट्रात विजेत्याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तब्बल १०० दिवसांचा हा रोमांचक प्रवास संपण्याच्या उंबरठ्यावर (final stage) आला आहे आणि अवघ्या काही तासांत कोणाच्या नशिबात विजेतेपदाची चमक येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पर्वाचे सूत्रसंचालन करणारे रितेश देशमुख यांनी संपूर्ण सिझनभर प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून ग्रँड फिनालेच्या उंबरठ्यावर शोने अधिकच रंगत घेतली आहे. घरात टॉप ५ स्पर्धक पोहोचले असून अंतिम क्षणांमध्ये प्रत्येक स्पर्धक आपली बाजू अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
फिनालेच्या आधी घरात माजी विजेत्यांची एन्ट्री झाल्याने वातावरण अधिकच उत्साही झाले. मेघा धाडे, शिव ठाकरे आणि विशाल निकम यांनी घरात येत स्पर्धकांसोबत संवाद साधला, गेम खेळले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर उत्कर्ष शिंदे आणि पुष्कर जोग यांनीही घरात धमाल वातावरण निर्माण केले. आता आणखी रंगत वाढवण्यासाठी सूरज चव्हाण, निकी तांबोळी आणि अभिजीत सावंत यांची एन्ट्री होणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
ग्रँड फिनाले १९ एप्रिल २०२६ रोजी, अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर पार पडणार आहे. रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टार वर हा सोहळा थेट पाहायला मिळणार आहे. व्होटिंग लाइन्स १८ एप्रिल दुपारी ३ वाजेपर्यंत खुल्या राहणार असून त्यानंतर प्रेक्षकांच्या मतांवर अंतिम निकाल ठरणार आहे. आता फक्त काही क्षणांचा अवधी शिल्लक असून ‘बिग बॉस मराठी ६’ चा विजेता कोण ठरणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.