मुंबईत गोरेगाव येथे म्युझिक कॉन्सर्टच्या आड रेव्ह पार्टी आणि झोम्बी ड्रग्ज प्रकरण चर्चेत असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रातून आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. (drugs) कोल्हापूर परिक्षेत्रात गांजा, एमडी ड्रग्ज, चरस आणि कोकेन यांचा फैलाव झपाट्याने वाढत असल्याने हा भाग ड्रग्ज तस्करीचा महत्त्वाचा हब बनत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या सव्वा वर्षातील पोलिसांच्या कारवाईकडे पाहिल्यास परिस्थिती किती भीषण आहे हे स्पष्ट होते. या काळात तब्बल 924 जणांना अटक करण्यात आली असून हजारो किलो गांजा आणि अफू जप्त करण्यात आले आहे. एमडी ड्रग्जसारख्या घातक पदार्थांचाही साठा पोलिसांच्या हाती लागला असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 68 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही आकडेवारी केवळ गुन्हेगारीचे प्रमाणच नव्हे तर तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेचेही गंभीर चित्र उभे करते.
या तस्करीमागे केवळ स्थानिक जाळे नसून त्याचे धागेदोरे गुजरात, हैदराबाद आणि दिल्लीपर्यंत पोहोचले असल्याचे तपासात उघड झाले आहे. काही प्रकरणांमध्ये परराज्यातील तस्करांनी महाराष्ट्रातूनच गांजा मागविल्याची कबुली दिल्यामुळे इतर राज्यांतील तपास यंत्रणाही आता पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय झाल्या आहेत.
सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. सांगली आणि कराड परिसरात निर्जन ठिकाणी ड्रग्ज निर्मितीचे कारखाने उभारले गेल्याच्या घटना देखील उघडकीस आल्या आहेत. या ठिकाणी तयार होणारा माल नंतर तरुणांच्या पार्ट्यांमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. कर्नाटक, राजस्थान, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणात गांजा मागवला जात असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.
या संपूर्ण साखळीत सर्वात धोकादायक बाब म्हणजे तरुणांचा वाढता सहभाग. सुरुवातीला नशेच्या आहारी गेलेले अनेक तरुण पुढे तस्करीकडे वळत असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळे ही समस्या केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरती मर्यादित न राहता सामाजिक संकटाच्या रूपात समोर येत आहे.
ड्रग्ज रॅकेटचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी केवळ बैठका घेऊन भागणार नाही, तर ठोस आणि कठोर कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. पोलिसांनी मुळापर्यंत पोहोचून या जाळ्याचा पर्दाफाश केला नाही, तर तरुणाईला या विळख्यातून बाहेर काढणे अधिक कठीण होणार आहे.
हेही वाचा
आता 100 रुपयांच्या मालावरही द्यावा लागणार टॅक्स
जास्त पगार असूनही बँक कर्ज देत नाहीये? तर ‘या’ ४ गोष्टींकडे लक्ष द्या
MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू