“गोकुळ” च्या सत्ता संघर्षात सी.एम., डी.सी.एम. उतरले

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात “गोकुळ”(Gokul) ही काही हजार कोटी रुपयांचा व्यवसाय किंवा उलाढाल असणारी सर्वात महत्त्वाची आणि मोठी संस्था. या संस्थेत स्वीकृत संचालक देण्याइतकाच मर्यादित अधिकार राज्य शासनाकडून, सत्ताधाऱ्यांकडून वापरला जायचा. गोकुळ चे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असा आदेश सदृश्य आग्रह किंवा दबाव त्यांच्यावर टाकला जाऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळ च्या सत्ता संघर्षात थेट हस्तक्षेप केला आहे. गोकुळच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे.

दोन वर्षांपूर्वी अरुण डोंगळे यांनी गोकुळचे अध्यक्ष पद आपणाला मिळाले पाहिजे यासाठी दबाव तंत्राचा वापर केला होता. त्यानंतर गोकुळ(Gokul) चे नेते काँग्रेसचे सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षांसाठी म्हणून अरुण डोंगळे यांना अध्यक्ष केले होते. त्यांची अध्यक्षपदाची मुदत संपली असून, त्यांनी ठरल्याप्रमाणे अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा असा आदेशच या नेत्यांनी त्यांना दिला.

आणखी एक वर्षानंतर गोकुळ ची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. या शेवटच्या वर्षात नेत्यांना दुसऱ्या एका संचालकाला अध्यक्ष म्हणून संधी द्यायची आहे. म्हणूनच त्यांनी अरुण डोंगरे यांच्याकडे राजीनामा मागितला आहे. मात्र अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे नेत्यांची राजकीय पंचाईत झाली आहे. अरुण डोंगळे यांनी गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला दांडी मारली होती. त्यांनी थेट मुंबईला जाऊन सह्याद्री अतिथी गृहांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेथे त्यांना गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नका असे सांगण्यात आले.

गोकुळ(Gokul) या व्यावसायिक सहकारी संस्थेवर महायुतीची सत्ता त्यांना आणावयाची आहे. आणि म्हणूनच अरुणा डोंगळे यांनी मी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही अशी स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये
राधानगरी भुदरगड या मतदारसंघातून प्रकाश अबिटकर यांना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची उमेदवारी दिली होती. त्यांना निवडून आणण्यात मदत करा, मी तुम्हाला विधान परिषदेवर घेतो असा शब्द तेव्हा एकनाथ शिंदे यांनी अरुण डोंगळे यांना दिला होता. कारण या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची डोंगळे यांनी तयारी केली होती. तथापि एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे आणि दिलेला शब्द ते तंतोतंत पाळतात याची खात्री झाल्यामुळे डोंगळे यांनी अबिटकर यांच्या मागे ताकद लावली होती.

प्रकाश अबिटकर हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी विजयाची हॅट्रिक केली. शिंदे यांनी त्यांना मंत्रीही केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपणाला विधान परिषदेवर घेण्याचा दिलेला शब्द पाळावा असा आग्रह डोंगळे यांनी धरला होता. तथापि विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्याकडून तिसऱ्याच कार्यकर्त्याला संधी दिली गेली. त्यामुळेच अरुण डोंगळे यांना गोकुळच्या अध्यक्षपदावर कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे पुढे आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आपल्या सोबत घेतले आहे.

अरुण डोंगळे यांनी विधानसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याची जाणीव ठेवून शिंदे यांनी गोकुळ च्या अध्यक्षपदावर डोंगळे यांना कायम ठेवण्याची संधी या निमित्ताने घेतली आहे. गोकुळच्या इतिहासात राज्याच्या सत्ता प्रमुखांनी हस्तक्षेप करण्याचा किंवा स्थानिक राजकारणात उतरण्याचा हा पहिला प्रसंग आहे.

गोकुळ(Gokul) दूध संघाची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीची कितीतरी वर्षे तिथे राजकारण आणले गेले नव्हते. आनंदराव चुयेकर पाटील यांनी दूध संघात राजकारण आणावयाचे नाही असा ठाम निर्धार केला होता. पण नंतर या गोकुळ मध्ये राजकारणाने प्रवेश केला. महादेवराव महाडिक यांच्याकडे प्रदीर्घकाळ गोकुळची सत्ता सूत्रे होती.

चार वर्षांपूर्वी गोकुळ दूध संघ हा सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येऊन या संघावर सत्ता प्रस्थापित केली.
विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यायचा नाही असे त्यांना राज्याच्या सत्ता प्रमुखांनी सांगितले आहे. त्यामुळे सतेज पाटील आणि मुश्रीफ यांची राजकीय पंचाईत झाली आहे. हसन मुश्रीफ हे महायुतीचे विद्यमान मंत्री आहेत.

एक वर्षानंतर गोकुळची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक महायुतीला जिंकावयाची आहे. त्याचाच एक भाग म्हणून अरुण डोंगळे यांना अध्यक्षपदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. तसे झाले तर या निवडणुकीत हसन मुश्रीफ
यांना सतेज पाटील विरोधी भूमिका घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा :

आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार रंगणार…

जिओची धमाका ऑफर! फक्त 100 रुपयांच्या रिचार्जमध्ये 299 रुपयांचे फायदे अन्

कोल्हापुरात एमबीए तरुणाचं टोकाचं पाऊल, चार पानी चिठ्ठी लिहून आयुष्याची अखेर