कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. एकूण 17 मतदारसंघांपैकी सहा मतदार संघातील निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. महाविकास आघाडी च्या सहा अधिकृत उमेदवारांनी नाट्यमयरित्या आपली उमेदवारी मागे घेऊन महायुतीच्या उमेदवारांचा अविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला आहे. अर्थात हे सहजासहजी घडलेले नाही, (victory) त्यामागे एक मोठे अर्थकारण दडलेले आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही.

सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न झाल्या. त्यामध्ये राज्यातील सर्व महापालिकांचा समावेश आहे. स्थानिक पातळीवरच्या या निवडणुका लागल्यानंतर आणि (victory) त्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे अनेक उमेदवार अविरोध निवडले गेले होते. मुंबई महापालिकेत तर सहा पेक्षा अधिक उमेदवार महायुतीचे अविरोध निवडले गेले होते.तेव्हा अर्थातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तेव्हाही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी अचानक माघार घेऊन त्यांच्याच नेत्यांना आश्चर्यचकित करून सोडले होते. आता त्याची पुनरावृत्ती होताना दिसते आहे. पुणे, वर्धा, ठाणे, यवतमाळ, रायगड, अहिल्यानगर या सहा विधानपरिषद मतदारसंघांमध्ये विक्रम काकडे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, प्राजक्ता तनपुरे, दुष्यंत चतुर्वेदी आणि अरुण लखानी हे महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या उमेदवारांनी या सहा मतदारसंघात आश्चर्यकारक माघार घेऊन महायुतीच्या विजयाचा प्रारंभ केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, संजय राऊत, विनायक राऊत, अंबादास दानवे वगैरे नेत्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पैसे देऊन माघार घ्यायला लावली असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे आणि तो निखालस खोटा आहे असे म्हणता येणार नाही. कारण मर्यादित मतदार संख्या असलेल्या विधानपरिषद मतदारसंघांमध्ये घोडेबाजार होतो आहे आणि तो सार्वकालिक आहे. तो आत्ताच महायुतीच्या काळात सुरू झालेला आहे असे कोणीही म्हणणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघांतील निवडणुकीमध्ये यंदाही घराणेशाहीचा प्रभाव पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे हे स्वतः खासदार आहेत, त्यांच्या कन्या आदिती तटकरे या महायुतीमध्ये मंत्री आहेत आणि आता त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे हे विधान परिषदेवर अविरोध निवडून गेले आहेत. आधी आपले वारसदार आणि मग जमलेच तर दुसऱ्या फळीतील कार्यकर्ता अशी सर्वच पक्षातील बहुतांशी नेत्यांची मानसिकता असते आणि आहे हे या निवडणुकीत दिसले आहे.
पक्षात येऊन काही त्रास सुद्धा झालेले नाहीत अशा विक्रम काकडे, प्राजक्त तनपुरे यांना महायुतीने या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. (victory) इतर ठिकाणी हेच चित्र आहे. सामान्य कार्यकर्त्याला किंवा दुय्यम फळीतील नेत्याला या निवडणुकीत स्थान दिले गेलेले नाही.अर्थात या निवडणुकीमध्ये पैशाचा प्रचंड प्रभाव असतो.मनी पॉवर हे इलेक्टिव्ह मेरिट या निवडणुकीत महत्त्वाचे ठरवले गेले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकीत बहुतांशी संस्थांमध्ये महायुतीचे प्राबल्य आहे. जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये बहुतांशी ठिकाणी महायुती विजयी होणार आहे. निवडणुका अविरोध करायच्या नाहीत म्हणून महाविकास आघाडीने सर्व ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. त्यापैकी सहा उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेताना किमान पक्ष नेतृत्वाला त्याची कल्पना देणे किंवा त्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. निवडणुकीत अर्ज भरल्यानंतर आपण निवडून येऊ शकत नाही. तेवढे संख्याबळ आपणाकडे नाही असा साक्षात्कार काही जणांना झाला आणि मग त्यांनी माघार घेतली आहे.यामध्ये निश्चितच घोडेबाजार झालेला आहे.
या निवडणुकीत मतदारांची संख्या मर्यादित असते. प्रत्येक मतदाराचे मूल्य ठरवले जाते. अर्थात मतदारांना पाकीट दिले जाते. मोठ्या प्रमाणावर अर्थकारण खेळले जाते. असे काही मतदार असतात की ते दोन्ही उमेदवाराकडून पाकीट स्वीकारतात.मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होतो हे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही माहीत असते.म्हणूनच जे मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करू शकतात अशाच धनदांडग्यांना उमेदवारी दिली जाते. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार हा काय नवा नाही. जे नेते घोडेबाजाराचा आरोप सध्या करत आहेत, त्यांनी सुद्धा घोडेबाजार केलेला आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्ह्यात ७२ हजार जणांचे मोफत रेशन बंद
भारत-व्हेनेझुएला ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन भागीदार
पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज काय आहे अपडेट?