शस्त्रसंधी आणखी वाढवली……………………….पण धाकधूक थांबली नाही !

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

इजरायलचे लेबनॉन वरील हल्ले थांबले आहेत. दोन आठवड्याच्या शस्त्र संधीची मुदत (ceasefire expired) संपल्यानंतर अमेरिकेने ती एकतर्फी पुन्हा वाढवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आमचा विश्वास नाही असे इराणने म्हटले आहे तर हार्मुझ समुद्रधुनीवरील नाकेबंदी उठवणार नाही असे अमेरिकेने स्पष्ट केल्यामुळे हल्ले प्रति हल्ले थांबले असले तरी पश्चिम आशियाई
देशांची धाकधूक थांबलेली नाही. इराणने त्यांच्या ताब्यातील हार्मुझ सामुद्रधुनी
सध्या हत्यार म्हणून वापरायला सुरुवात केली आहे. आणि त्यामुळे भारतासह अनेक देश चिंतेत पडले आहेत. अमेरिकेने तीस देशांची बैठक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्याच दरम्यान या सामुद्रधुनीमध्ये आपले नौदल पाठवून अमेरिकेने नाकाबंदी केली आहे. आता याच कारणावरून युद्धाची पुन्हा ठिणगी पडू शकते.

हार्मुझमुळे भारताच्या इंधन आयातीमध्ये अडचणी आलेल्या आहेत. इंधनाच्या एकूण आयातीच्या 65 टक्के आयात याच सामुद्रधुनी मधून भारतात होत असते. तेल संपन्न अशा 27 देशांमधून भारत इंधन खरेदी करतो. आता पर्याय म्हणून आणखी काही देशांची त्यात भर पडली आहे, जवळपास 45 ठिकाणावरून इंधन येणार आहे. भारताबरोबर इतरही देशांची या समुद्रधुनी मधून होणारी जलवाहतूक सध्या थांबली आहे. युद्धामध्ये झालेली हानी भरून काढण्यासाठी इराणने हार्मुजला आपली तिजोरी बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

इराण ने हार्मुझ सामुद्रध्वनी विना टोल आणि विनाअट मुक्त केली पाहिजे, समृद्ध युरेनियमचा साठा अमेरिकेला विकत दिला पाहिजे. किमान 20 वर्षे अण्वस्त्र कार्यक्रम थांबवला पाहिजे अशा अटी ट्रम्प महाशयांनी घातलेल्या आहेत. भारताचा अमेरिकेबरोबरचा
व्यापार मोठा आहे. शिवाय अमेरिकेचे हवाई तळ असलेल्या कुवेत, कतार, सौदी अरेबिया, बहरीन, संयुक्त अरब अमीरात, इराक आदी देशांमध्ये किमान एक कोटी भारतीय नोकरीला आहेत. इजरायल भारताला लष्करी तंत्रज्ञान पुरवतो, रशिया हा पारंपरिक मित्र, इरांकडून इंधन खरेदी करावे लागते, त्यामुळेच भारताला मध्यपूर्वेतील युद्ध परिस्थितीत तटस्थ भूमिका घ्यावी लागते. भारताची ही अडचण लक्षात न घेताच केंद्र सरकारवर अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते अमेरिकेला घाबरतात अशी टीका देशांतर्गत विरोधकांच्याकडून
केली जाते आहे.

भारताला मोठ्या प्रमाणावर युद्धग्रस्त देशांकडून ऊर्जा खरेदी करावी लागते. या ऊर्जा खरेदी शी विकास दर जोडला गेलेला आहे. आणि म्हणूनच चौथी महासत्ता बनलेल्या भारताला मध्य पूर्वेतील इजरायल अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातील युद्ध परवडणारे नाही. आणि म्हणूनच कायमस्वरूपी युद्ध विराम झाला पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करताना, आपल्यातील युद्धज्वर कमी झालेला नाही असे असाही एक संदेश त्यांनी इराण ला पाठवला आहे. हार्मुझ सामुद्रधुनी विनाअट खुली करा, समृद्ध युरेनियमचे किंवा कच्च्या युरेनियमचे साठे अमेरिकेच्या स्वाधीन करा, अणू कार्यक्रम वीस वर्षांपर्यंत पोस्टपोन करा, अशा अटी घातल्या आहेत अर्थात या अटी इराणने विना विलंब फेटाळून लावल्या आहेत.

ट्रम्प यांनी, अमेरिकेशी जुळवून घेतले नाही तर शिल्लक राहिलेला इराण बेचिराख करून टाकू, जगाच्या नकाशावरून इराणला गायब करून टाकू असा इशारा ट्रम्प यांनी दिल्यामुळे आणि इराणने आम्ही कोणालाही घाबरत नाही, अमेरिकेला जसेच्या तसे उत्तर देऊ असा प्रति इशारा दिल्यामुळे कायमस्वरुपी युद्धविरामाची शक्यता अगदीच धुसरं आहे.

हेही वाचा

राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचं भवितव्य ठरणार

लग्नासाठी अल्पवयीन मुलीचं अपहरण, हात-पाय बांधून जिल्हा परिषदेच्या शाळेत डांबलं अन् महाराष्ट्राला हादरवणारी घटना

पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट