आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद! 1 मेपासून कुठे बसणार सर्वाधिक फटका?

राज्यातील वाढत्या उष्णतेमुळे पाणीसाठ्यांवर ताण वाढू लागला असून, (water) अनेक भागांत पाणीटंचाईची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. विशेषतः मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा मर्यादित पातळीवर आल्याने प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना येत्या काही महिन्यांत पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जलसंपदा विभागाच्या सूचनांनुसार, सध्याचा उपलब्ध साठा 31 ऑगस्टपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियोजन करण्यावर भर दिला जात आहे.(water) यासाठी ठोस उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, बारवी धरण येथून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. या धरणातून ठाणे जिल्ह्यासह आसपासच्या ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो, मात्र वाढती मागणी लक्षात घेता पुरवठा नियंत्रित करणे अपरिहार्य ठरले आहे.

प्रशासनाच्या निर्णयानुसार 1 मेपासून आठवड्यातून एक दिवस, म्हणजेच 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांवर होणार आहे. पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर पुन्हा सुरू करताना जलवाहिन्यांवर अचानक दाब वाढू नये यासाठी पुढील काही दिवस कमी दाबानेच पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नागरिकांना सलग तीन ते चार दिवस पाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने यंदा पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता वर्तवली असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात अधिक पाणीसाठा असला तरी वाढत्या तापमानामुळे त्याचा वेगाने वापर होत आहे. (water) त्यामुळे जुलैपर्यंत नव्हे तर ऑगस्ट अखेरपर्यंत साठा टिकवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे, गळती टाळणे आणि अनावश्यक वापर टाळणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आगामी काळात परिस्थिती कशी बदलते यावर पुढील निर्णय अवलंबून असणार असून, सध्या तरी पाण्याचा योग्य वापर हाच उपाय असल्याचे अधोरेखित केले जात आहे.

हेही वाचा

राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचं भवितव्य ठरणार

लग्नासाठी अल्पवयीन मुलीचं अपहरण, हात-पाय बांधून जिल्हा परिषदेच्या शाळेत डांबलं अन् महाराष्ट्राला हादरवणारी घटना

पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट