राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याच्या निर्णयामुळे वातावरण तापू लागले आहे. १ मेपासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानंतर आता त्याचे पडसाद रस्त्यावर उमटताना दिसत आहेत. या निर्णयाविरोधात काही अमराठी रिक्षा चालक संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी ४ मेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, या निर्णयाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मैदानात उतरली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून रिक्षांवर मराठी समर्थक स्टिकर्स लावण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला स्थानिक प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.या स्टिकर्सवर “मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा!” असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. या माध्यमातून मराठी बोलणाऱ्या चालकांना प्रोत्साहन देणे आणि प्रवाशांना सोयीस्कर संवाद साधता यावा हा उद्देश असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मनीष धुरी आणि कुशल धुरी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम अधिक वेगाने राबवली जात आहे.
मुंबईसारख्या बहुभाषिक शहरात अनेकदा प्रवाशांना भाषेच्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः रिक्षा आणि टॅक्सी प्रवासादरम्यान संवाद न होणे ही सामान्य तक्रार आहे. अशा पार्श्वभूमीवर “मराठी येते” असे दर्शवणाऱ्या रिक्षांकडे प्रवाशांचा कल वाढताना दिसत आहे.तथापि, या निर्णयामुळे ‘मराठी विरुद्ध अमराठी’ असा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. एका बाजूला स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याची मागणी जोर धरत असताना, दुसऱ्या बाजूला काही संघटना याला विरोध करत आहेत. येत्या काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचं भवितव्य ठरणार