रियान परागच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने अखेर पंजाब किंग्सचा विजयरथ रोखत आयपीएल 2026 मध्ये दमदार विजय मिळवला. न्यू चंडीगड येथे झालेल्या 39 व्या सामन्यात (winning streak) राजस्थानने पंजाबवर 6 विकेट्सने मात करत मोसमातील सहावा विजय नोंदवला. विशेष म्हणजे पंजाबला आठ सामन्यांनंतर पहिल्यांदाच पराभव स्वीकारावा लागला.

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 222 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. पंजाबकडून मार्कस स्टोयनिसने अखेरच्या षटकांत तुफानी फटकेबाजी करत नाबाद 62 धावा केल्या. प्रभसिमरन सिंहने 59 धावा करत चांगली साथ दिली. कर्णधार श्रेयस अय्यर आणि कूपर कोनोली यांनी प्रत्येकी 30 धावा जोडल्या, तर प्रियांश आर्याने 29 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून यश राज पुंजाने दोन विकेट्स घेतल्या, तर जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात आक्रमक झाली. यशस्वी जैस्वालने 27 चेंडूत 51 धावांची झंझावाती खेळी करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली. त्याने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीनेही फक्त 16 चेंडूत 43 धावांची धडाकेबाज खेळी करत पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याच्या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता.
मधल्या फळीत ध्रुव जुरेलने 16, तर कर्णधार रियान परागने 29 धावा करत डाव सावरला. शेवटच्या टप्प्यात डोनोवन फेरेरा आणि शुभम दुबे यांनी पंजाबच्या हातातून सामना हिसकावून घेतला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी अवघ्या 32 चेंडूत नाबाद 77 धावांची भागीदारी केली. फेरेराने 26 चेंडूत नाबाद 52 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. शुभम दुबेनेही 12 चेंडूत नाबाद 31 धावा करत मोलाची साथ दिली.
राजस्थानने 19.2 षटकांत 4 विकेट्स गमावून 228 धावा करत सामना जिंकला. हा राजस्थानच्या आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वोच्च यशस्वी धावांचा पाठलाग ठरला. पंजाबकडून युझवेंद्र चहलने 3 विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप सिंहला 1 यश मिळाले. मात्र इतर गोलंदाजांना राजस्थानच्या फलंदाजांसमोर प्रभाव टाकता आला नाही.
हेही वाचा
अरविंद केजरीवाल यांचा …….न्यायासाठी सत्याग्रह ?.
पोलादी सुरक्षा व्यवस्था …..जेव्हा भेदली जाते…
‘राजा शिवाजी’मधील लहान मुलाच्या त्या सीनवर कात्री सेन्सॉर बोर्डाने सुचवले हे मोठे बदल