पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम परिसरात प्रेमविवाहाला नकार दिल्याच्या संतापातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत २४ वर्षीय नॅन्सी मिश्रा आणि तिची ४५ वर्षीय आई सरिता मिश्रा यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. (double murder case) या प्रकरणातील आरोपी शिवम उपाध्याय (वय २७) याने हल्ल्यानंतर स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

नॅन्सी आणि शिवम यांचे मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मंगळवारी रात्री शिवम आपल्या नातेवाइकांसह नॅन्सीच्या घरी विवाहासाठी प्रस्ताव घेऊन गेला होता. मात्र नॅन्सीच्या आईने या नात्याला स्पष्ट विरोध दर्शवला आणि त्यानंतर नॅन्सीनेही विवाहास नकार दिला. या घडामोडींमुळे संतप्त झालेल्या शिवमने बुधवारी दुपारी विरार पश्चिमेतील न्यू विवा कॉलेजजवळील पूनम आकांक्षा इमारतीत नॅन्सीच्या घरी जाऊन दोघींवर हल्ला केला.
घरातून आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली असता नॅन्सी आणि सरिता मिश्रा या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळल्या. त्याचवेळी शिवमही गंभीर जखमी अवस्थेत सापडला. स्थानिकांनी तातडीने तिघांनाही रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी नॅन्सी आणि तिच्या आईला मृत घोषित केले.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. बोलिंज पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद हा या भीषण घटनेमागील कारण असल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा
हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; ‘लव्ह जिहाद’ने महाराष्ट्र हादरला
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर