बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सीईटी परीक्षेच्या दुसऱ्या संधीच्या तारखा (important update) अधिकृतपणे जाहीर केल्या असून ही परीक्षा ९ मे ते २१ मे २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एमबीए, एमएमएस, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र तसेच कृषी शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरातून या दुसऱ्या संधीच्या परीक्षेसाठी तब्बल ४ लाख ९२ हजार ३८३ विद्यार्थी बसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वी घेण्यात आलेल्या पहिल्या संधीच्या सीईटी परीक्षेसाठी ८ लाख ६ हजार २३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ लाख ३३ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आता दुसऱ्या संधीची परीक्षा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आपला गुण सुधारण्याची मोठी संधी मिळाली आहे.

राष्ट्रीय स्तरावरील विविध प्रवेश परीक्षांमध्ये दोन संधी दिल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यानेही हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी पहिली परीक्षा देणे अनिवार्य असले तरी दुसऱ्या परीक्षेला बसायचे की नाही, हा निर्णय विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन्ही परीक्षा दिल्यास ज्या परीक्षेत जास्त टक्केवारी मिळेल तोच निकाल अंतिम मानला जाणार आहे. त्यामुळे स्पर्धात्मक प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अधिक चांगले गुण मिळवण्याची संधी मिळणार असून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

हेही वाचा

अरविंद केजरीवाल यांचा …….न्यायासाठी सत्याग्रह ‌?.

पोलादी सुरक्षा व्यवस्था …..जेव्हा भेदली जाते…

‘राजा शिवाजी’मधील लहान मुलाच्या त्या सीनवर कात्री सेन्सॉर बोर्डाने सुचवले हे मोठे बदल