कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वाढता वापर आता रोजगार बाजारासाठी मोठं आव्हान ठरताना दिसत आहे. आयटी क्षेत्रानंतर आता बँकिंग क्षेत्रातही एआयमुळे नोकरकपातीची चर्चा सुरू झाली आहे. (major challenge) देशातील प्रमुख खासगी बँकांनी गेल्या वर्षभरात कर्मचारी संख्येत कपात केली असून, यामागे डिजिटलायझेशन आणि ऑटोमेशनचा मोठा वाटा असल्याचं मानलं जात आहे.

एचडीएफसी बँकेत 2025 मध्ये सुमारे 2 लाख 14 हजार कर्मचारी होते. मात्र 2026 मध्ये ही संख्या 2 लाख 11 हजारांवर आली आहे. म्हणजेच जवळपास चार हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली. अॅक्सिस बँकेची कर्मचारी संख्या देखील 1 लाख 4 हजारांवरून 1 लाख 1 हजारांपर्यंत खाली आली आहे. आरबीएल बँकेतही 14 हजार 265 वरून 13 हजार 316 पर्यंत कर्मचारी संख्या घटल्याचं दिसून येत आहे.
आयसीआयसीआय बँकेत सर्वाधिक कपात झाल्याचं चित्र आहे. 2025 या आर्थिक वर्षात 1 लाख 30 हजार कर्मचारी असलेल्या बँकेत 2026 मध्ये ही संख्या 1 लाख 24 हजारांवर आली आहे. म्हणजेच एका वर्षात सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
विशेष म्हणजे एकीकडे कर्मचारी कपात होत असताना दुसरीकडे या बँका शाखाविस्तारावर भर देताना दिसत आहेत. एचडीएफसी बँकेने 234 नवीन शाखा सुरू केल्या आहेत. अॅक्सिस बँकेने गेल्या वर्षभरात 400 नवीन शाखा उघडल्या, तर आयसीआयसीआय बँकेने देशभरात जवळपास 600 नवीन शाखा सुरू केल्या आहेत.
तज्ज्ञांच्या मते, एआयमुळे बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्या पूर्णपणे संपणार नाहीत, मात्र कामाचं स्वरूप नक्कीच बदलणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, लोन प्रोसेसिंग, ग्राहक सेवा, डेटा विश्लेषण आणि ऑपरेशनल प्रक्रिया यांसारखी अनेक कामं आता चॅटबॉट्स आणि एआय आधारित सिस्टिमद्वारे केली जात आहेत. ज्या कामांसाठी पूर्वी मोठ्या मनुष्यबळाची गरज होती, ती कामं आता कमी वेळेत आणि अधिक अचूकतेने तंत्रज्ञानाद्वारे पूर्ण होत आहेत.
बँकिंग क्षेत्र आता ‘लेस ह्युमन, मोर टेक’ या नव्या धोरणाकडे वाटचाल करत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे भविष्यात रोजगार टिकवण्यासाठी पारंपरिक कौशल्यांबरोबरच एआय, डेटा अॅनालिटिक्स आणि डिजिटल बँकिंगची माहिती असणं आवश्यक ठरणार आहे. एआय रोजगार हिरावून घेणार की नव्या संधी निर्माण करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा
अरविंद केजरीवाल यांचा …….न्यायासाठी सत्याग्रह ?.
पोलादी सुरक्षा व्यवस्था …..जेव्हा भेदली जाते…
‘राजा शिवाजी’मधील लहान मुलाच्या त्या सीनवर कात्री सेन्सॉर बोर्डाने सुचवले हे मोठे बदल