सांगलीत धक्कादायक निष्काळजीपणा! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या महिलेला एड्स पॉझिटिव्ह रिपोर्ट; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

सांगलीत वैद्यकीय निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका महिलेला टेके आय क्लिनिकच्या (shocking case) प्रयोगशाळेत HIV पॉझिटिव्ह असल्याचा चुकीचा अहवाल देण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. नंतर पुन्हा तपासणी केल्यानंतर संबंधित महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी सांगलीतील नेत्रतज्ज्ञ डॉ. रमाकांत टेके आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ तंजना मोमीन यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता पवार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील वृद्ध महिला नेत्र तपासणी शिबिरातून टेके आय क्लिनिकमध्ये आली होती. तपासणीत त्यांना मोतिबिंदू असल्याचे निदान झाले. शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक चाचण्यांचा भाग म्हणून क्लिनिकच्या लॅबमध्ये HIV आणि हिपॅटायटिस बी तपासणी करण्यात आली. त्यावेळी HIV पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल देण्यात आला.

हा अहवाल मिळाल्यानंतर महिलेसह कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला. संशय आल्याने नातेवाईकांनी १९ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या ठिकाणी पुन्हा तपासणी केली. त्यामध्ये HIV अहवाल निगेटिव्ह आल्याने क्लिनिकच्या चाचणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यानंतर नातेवाईकांनी संबंधित क्लिनिकविरोधात जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार दाखल केली. चौकशीनंतर मनपा आरोग्य विभागाने पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, संबंधित महिला शिबिरातून आल्या होत्या आणि त्यांची स्क्रिनिंग टेस्ट करण्यात आली होती. अशा प्राथमिक तपासण्यांमध्ये पाच ते दहा टक्के त्रुटी संभवतात. अहवालानंतर महिलेला व कुटुंबीयांना पुढील तपासणीचा सल्ला देण्यात आला होता, असे क्लिनिककडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी

मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?

 गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल