तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर अखेर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही राज्यांत आज, शनिवारी ९ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. (assembly elections) तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि राजकारणी थलापती विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून पश्चिम बंगालमध्ये भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

तामिळनाडूमध्ये विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने पहिल्याच विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत १०८ जागांवर विजय मिळवला. मात्र स्पष्ट बहुमतासाठी काही जागांची कमतरता असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेर काँग्रेससह डाव्या पक्षांनी विजय यांना पाठिंबा जाहीर केला. CPI, CPI(M) आणि VCK या पक्षांच्या पाठिंब्यामुळे विजय यांनी बहुमताचा ११८ चा आकडा गाठला आहे. शुक्रवारी त्यांनी राज्यपाल आर. एन. रवी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपने मोठा विजय मिळवत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पराभूत केले आहे. राज्याच्या राजकारणात मोठे सत्तांतर घडवत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. पक्षाने सुवेंदू अधिकारी यांची विधीमंडळ पक्षनेते म्हणून एकमताने निवड केली असून ते आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राऊंडवर सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीचा भव्य सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. एकाच दिवशी दोन मोठ्या राज्यांमध्ये नव्या सरकारांची स्थापना होत असल्याने देशाचे लक्ष आज तामिळनाडू आणि पश्चिम बंगालकडे लागले आहे.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?