साताऱ्यात काळाचा घाला! आयशर ट्रक खोल दरीत कोसळला; लहान मुलासह ४ जणांचा मृत्यू

सातारा तालुक्यातील कासरतळे येथे आयशर ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह (terrible accident) एका लहान मुलाचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे सातारा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबाचे पुनर्वसन झाल्यानंतर ते आपल्या घरातील संसारोपयोगी साहित्य आयशर ट्रकमध्ये भरत होते. सर्व सामान भरून ट्रक निघण्याच्या तयारीत असतानाच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाचा अंदाज चुकला आणि ट्रक थेट सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळला. अचानक घडलेल्या या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

ट्रकमध्ये घरगुती साहित्याबरोबरच कुटुंबातील पाळीव जनावरेही होती. या दुर्घटनेत काही जनावरांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने ट्रक चालकाचा जीव वाचला असून तो सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

अपघाताचा मोठा आवाज होताच कासरतळे परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघात नेमका कसा घडला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?