मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून कसारा-इगतपुरी मार्गावर तांत्रिक देखभाल आणि पायाभूत सुविधा उन्नतीकरणासाठी १२ ते १६ मे २०२६ या कालावधीत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.(Railway) त्यामुळे परिसरातील मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय प्रवाशांना काही दिवस गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. विशेषतः कसारा आणि आसनगावदरम्यान धावणाऱ्या लोकल सेवांवर याचा मोठा परिणाम होणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, कसारा ते इगतपुरी दरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंटशी संबंधित तांत्रिक अडथळे दूर करणे, तसेच पुढील कामांसाठी आवश्यक पूर्वतयारी करणे हा या ब्लॉकचा मुख्य उद्देश आहे. १२ आणि १३ मे रोजी दुपारी ३:५० ते ५:५० या वेळेत दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Railway)त्यानंतर १४ ते १६ मे दरम्यान पहाटे ३ ते ५ या वेळेत रात्रीच्या सत्रात कामे करण्यात येणार आहेत.
दुपारच्या ब्लॉकमुळे काही कसारा लोकल गाड्या आसनगावपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटीहून दुपारी १:१०, २:१७ आणि २:४६ वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल सेवा केवळ आसनगावपर्यंत धावतील. परतीच्या दिशेने कसाराहून सुटणाऱ्या काही गाड्या प्रत्यक्षात आसनगाव येथूनच मुंबईकडे रवाना होतील. (Railway) त्यामुळे कसारा ते आसनगाव या दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी वाहतुकीची तयारी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.ब्लॉकदरम्यान प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी म्हणून रेल्वेने शेवटच्या आणि पहिल्या गाड्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. ब्लॉकपूर्वी कसारासाठी सीएसएमटीहून दुपारी १२:३० वाजता शेवटची लोकल सुटेल, तर ब्लॉकनंतर पहिली सेवा सायंकाळी ४:५० वाजता सुरू होईल. कसाराहून मुंबईकडे ब्लॉकपूर्वीची शेवटची गाडी दुपारी २:४२ वाजता सुटणार असून, ब्लॉकनंतरची पहिली गाडी सायंकाळी ६:१७ वाजता धावेल.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दुपारच्या ब्लॉकचा परिणाम मुख्यतः उपनगरीय लोकल सेवांवर होईल. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक शक्यतो सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रात्री घेतल्या जाणाऱ्या ब्लॉकचा नियमित गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. सुरक्षित आणि सक्षम रेल्वे सेवा राखण्यासाठी ही देखभाल कामे आवश्यक असल्याचे सांगत प्रशासनाने प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली आहे.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?