सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करा, निवडणूक बारामतीची, चर्चा मुख्यमंत्रिपदाची

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला उधाण आलं आहे. (Maharashtra’s politics) बारामतीतील पोटनिवडणुकीच्या प्रचारातून या चर्चेला नवसंजीवनी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये अनेक नेत्यांनी अजित पवार यांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न अद्याप अपूर्ण असल्याची भावना व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. त्यांनी आपल्या भाषणात, “दादांचं स्वप्न काकींच्या माध्यमातून पूर्ण होईल,” असा विश्वास व्यक्त केला, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा पुढे आली.

या वक्तव्याला आणखी बळ मिळालं ते छगन भुजबळ यांच्या सूचक विधानामुळे. त्यांनीही राजकारणात कोणतीही परिस्थिती उद्भवू शकते आणि सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं म्हटलं. त्यामुळे सत्ताधारी गोटातच संभाव्य नेतृत्वबदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या सगळ्या घडामोडींवर विरोधकांनीही जोरदार टीका केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी असा दावा केला की, भविष्यात नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला, तर देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सुनेत्रा पवार यांनाच अधिक प्राधान्य देतील.

अजित पवार यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेबाबत यापूर्वी अनेकदा खुलेपणाने भूमिका मांडली होती. मात्र काही काळ ही चर्चा शांत झाली होती. आता बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या मुद्द्याने डोके वर काढले असून, पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणात या चर्चेचे नेमके काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा ;

मोबाईलच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या कंपनीचे फोन किती महाग झाले?

लाडक्या बहि‍णींची अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट, या दिवशी लागण्याची शक्यता