15 एप्रिलपासून नियम बदलणार, गाडीला ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ नसेल तर बसणार मोठा फटका, असा करा ऑनलाईन अर्ज

15 एप्रिल 2026 पासून देशभरातील वाहनधारकांसाठी एक महत्त्वाचा (vehicle owners) बदल लागू होत आहे. वाहन सुरक्षेच्या दृष्टीने अनिवार्य असलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) आता केवळ शिफारस राहिलेली नाही, तर ती सक्तीची करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयानंतर जुन्या पद्धतीच्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांना विविध सेवांपासून वंचित राहावे लागू शकते. विशेष म्हणजे, प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) देण्यास नकार देणे आणि नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या दंडाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

या नव्या नियमांमुळे वाहनधारकांमध्ये चिंता वाढली असली, तरी प्रक्रिया मात्र अतिशय सोपी ठेवण्यात आली आहे. आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज उरलेली नाही. वाहनधारक घरी बसून मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून काही मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी अधिकृत bookmyhsrp.com या पोर्टलचा वापर करावा लागतो.

या संकेतस्थळावर जाऊन वाहनधारकांना आपल्या वाहनाची मूलभूत माहिती जसे की नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांक भरावे लागतात. त्यानंतर जिल्हा निवडून, नंबर प्लेट बसवण्यासाठी जवळचा अधिकृत डीलर निवडता येतो. सोयीच्या वेळेनुसार अपॉईंटमेंट स्लॉट बुक करून ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर मिळणारी पावती जतन करून ठेवणे महत्त्वाचे असते, कारण ती तपासणीदरम्यान दंड टाळण्यासाठी उपयोगी पडू शकते.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे अनेक फायदेही आहेत. या प्लेट्स खास प्रकारच्या तंत्रज्ञानाने बनवलेल्या असल्यामुळे त्या एकदा बसवल्यानंतर सहज काढता येत नाहीत, त्यामुळे वाहन चोरीस प्रतिबंध होतो. प्रत्येक प्लेटला एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो, जो थेट सरकारी डेटाबेसशी जोडलेला असतो. यामुळे वाहनाची माहिती अधिक सुरक्षित आणि पारदर्शक राहते. याशिवाय प्लेटवरील रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह शीटमुळे रात्रीच्या वेळीही वाहनाचा नंबर स्पष्टपणे दिसतो.

यासोबत मिळणारा रंग-कोडेड स्टिकरही महत्त्वाचा मानला जातो. या स्टिकरमुळे वाहन पेट्रोल, डिझेल किंवा इतर इंधनावर चालते हे सहज ओळखता येते. प्रदूषण नियंत्रणासाठीही हा घटक उपयुक्त ठरतो.

एकंदरीत, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही केवळ नियमांची अट नसून वाहन सुरक्षेचा महत्त्वाचा भाग बनली आहे. नियमांचे पालन न केल्यास आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे वाहनधारकांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.

हे ही वाचा ;

मोबाईलच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या कंपनीचे फोन किती महाग झाले?

लाडक्या बहि‍णींची अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट, या दिवशी लागण्याची शक्यता