राधानगरी तालुक्यातील येळवडे ता. राधानगरी रक्षाविसर्जनासाठी (Honeybee) स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर १२ जणांची प्रकृती गंभीर झाल्याची धक्कादायक घटना आज ता.१५ सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे दहाच्या सुमारास येळवडे येथील एका व्यक्तीचे रक्षाविसर्जन करण्यासाठी नातेवाईक व गावकरी स्मशानभूमीत मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी स्मशानभूमीजवळील नारळाच्या झाडाच्या फांदीवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला कावळ्याचा धक्का लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या मधमाशांनी अचानक उपस्थितांवर हल्ला चढवला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे (Honeybee) वातावरण निर्माण झाले. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळू लागले. काहींनी जवळच असलेल्या पोल्ट्री शेडमध्ये आश्रय घेतल्याने त्यांचा बचाव झाला. मात्र, अनेकांना मधमाशांच्या दंशामुळे गंभीर दुखापती झाल्या.या घटनेत १०० हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांना तातडीने राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. काहींना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर तसेच खाजगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
यापैकी सुमारे १० ते १२ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना विशेष (Honeybee) उपचारासाठी सीपीआरमध्ये हलवण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने मदतकार्य सुरू केले. वैद्यकीय पथकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, या घटनेमुळे येळवडे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा
१८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता
दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या १० वीचा निकाल लागणार?
अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५% जास्त; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर