आगीत तीन कुटुंबीय दगावले, बचावलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, अख्खं गाव हळहळलं, एकाही घरात चूल पेटली नाही

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील साकोरे गावात गुरुवारी घडलेल्या (heartbreaking incident) एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पांझण नदीपात्रात शेतीसाठी लावलेल्या विद्युत पंपाला सुरू करण्यासाठी गेलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांचा विजेचा तीव्र धक्का लागून जागीच मृत्यू झाला. शिरीष पठाडे (४४) आणि जगदीश खैरनार (३८) अशी मृतांची नावे असून, दोघेही गावातील मेहनती आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे म्हणून ओळखले जात होते.

घटनेनंतर काही वेळातच ही बातमी गावभर पसरली आणि साकोरे गावावर शोककळा पसरली. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गावात कोणत्याही घरात चूल पेटली नाही. सर्वत्र हळहळ आणि स्तब्धता पाहायला मिळत होती. दोन्ही कुटुंबांवर कोसळलेल्या दुःखामुळे ग्रामस्थांनाही त्यांना सांत्वन करण्यासाठी शब्द सापडत नव्हते.

मिळालेल्या माहितीनुसार, कडाक्याच्या उन्हात पिकांना पाणी देण्यासाठी दोघेही शेतात गेले होते. पंप सुरू करत असताना तांत्रिक बिघाडामुळे विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद नांदगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

जगदीश खैरनार यांच्या आयुष्यात याआधीही मोठा आघात झाला होता. सुमारे वीस वर्षांपूर्वी त्यांच्या झोपडीवर वीज कोसळून लागलेल्या आगीत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी ते जीव वाचवण्यात यशस्वी झाले होते, मात्र आता नियतीने पुन्हा एकदा त्यांच्यावर घाला घातला.

दरम्यान, शिरीष पठाडे यांच्या घरी काही दिवसांवरच त्यांच्या मुलीचा विवाह ठरला होता. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या या सोहळ्याच्या तयारीला वेग आला होता. पण या घटनेने आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलले. मुलीच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी दोन्ही शेतकऱ्यांवर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे नांदगाव तालुक्यातून शोक व्यक्त केला जात असून, शेतीतील विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा

धक्कादायक! तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी, पोलिसाच्या कृत्याने संताप

मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार, विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फॉर्म भरण्याच्या नियमात मोठे बदल