बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर शनिवारी (30 ऑगस्ट) बीड सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने(court) तत्काळ निर्णय न देता निकाल राखून ठेवला आहे. दिवसभरात ऑर्डर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, राज्यभरात या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोपींवर सुनावणी आणि निकाल राखून ठेवला :
या बहुचर्चित प्रकरणात शनिवारी 13 वी सुनावणी पार पडली. मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबतच आरोपी विष्णू चाटे यांच्या दोषमुक्ती अर्जावरही सुनावणी झाली. परंतु न्यायालयाने(court) या दोन्ही अर्जांवर निकाल राखून ठेवला आहे. पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार असून, या दिवशी या प्रकरणातील चार्ज फ्रेमिंग अपेक्षित आहे.

सुनावणीच्या दिवशी फिर्यादी पक्षाचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टात अनुपस्थित होते. तर आरोपींच्या वकिलांनी तब्येतीची अडचण सांगत हजेरी लावली नाही. या कारणामुळेही प्रकरण लांबणीवर गेलं. दरम्यान, आरोपींच्या बाजूने वकिलांची संख्या वाढवून शक्तीप्रदर्शन केलं जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

धनंजय देशमुखांचा आरोप : कृष्णा आंधळे अद्याप फरार :
मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना तपास यंत्रणेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केलं की, आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे आणि पोलिस यंत्रणेला त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. “मी वेळोवेळी तपास यंत्रणेशी संपर्क साधतो, पण केवळ शोध सुरू असल्याचं उत्तर मिळतं. हे गंभीर आहे,” असे ते म्हणाले.

या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोपींवर कारवाई लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, 10 सप्टेंबरच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. न्यायालय कोणता निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

गोकुळच्या दूध दरात झाली वाढ; म्हैस-गायीचे दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागले

 ‘शक्तिपीठ’विरोधी आंदोलन होणार तीव्र, सतेज पाटील, राजू शेट्टींची ताकद लागणार पणाला…

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी