महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (political) विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील जागांसाठी लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या जागा रिक्त असल्यामुळे अखेर या प्रक्रियेला वेग आला असून, पुढील दहा ते बारा दिवसांत अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

जिल्हा परिषदांच्या काही निवडणुका अद्याप प्रलंबित असल्या तरी, त्याचा या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे संबंधित अहवाल लवकरच पाठवला जाणार असून, त्यानंतर निवडणुकीची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. सोलापूर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागांतील या १७ मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, विधानसभेतून निवडून दिल्या जाणाऱ्या ९ जागांसाठीही लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या नऊ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असल्याने पुढील आठवड्यातच या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावरून चुरस वाढण्याची शक्यता आहे.
सध्याच्या संख्याबळानुसार भाजपला पाच, शिवसेनेला दोन, राष्ट्रवादीला एक आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळण्याचे चित्र दिसत आहे. मात्र राष्ट्रवादीकडे असलेल्या अतिरिक्त मतांमुळे समीकरणे बदलू शकतात. महायुतीने अधिक उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असून, थेट लढतीची शक्यता वाढली आहे.
एकूणच, विधान परिषदेच्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार असून, आगामी काळात सत्तासमीकरणांमध्येही बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार
इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय