मुंबई, ता. १५ — गत आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ला मोठा आर्थिक फटका बसल्याचे चित्र समोर आले आहे. या कालावधीत महामंडळाने ११ हजार ४७५ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले असले, तरी खर्चाचा आकडा १२ हजार ०६६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. परिणामी एसटीला (major) तब्बल ५९१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. दैनंदिन सरासरी उत्पन्न ३१ कोटी ४० लाख रुपये असून खर्च ३३ कोटी रुपयांपर्यंत जात असल्याने दररोज सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा होत आहे.

या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, येत्या आर्थिक वर्षात उपलब्ध बस आणि मनुष्यबळाचा अधिक कार्यक्षम वापर करून वाहतुकीचे नियोजन सुधारले पाहिजे. दैनंदिन तोटा दीड ते दोन कोटी रुपयांच्या आसपास असून तो कमी करणे हे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
मागील वर्षात जालना, परभणी, बुलडाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे आठ विभाग नफ्यात राहिले, मात्र उर्वरित २३ विभागांमध्ये तोटा झाला. विशेषतः नाशिक, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे या मोठ्या विभागांतील वाढता तोटा चिंताजनक असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
तोट्यातील विभागांची सखोल चौकशी करून त्यामागील कारणांचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सातत्याने तोट्यात असलेल्या विभागांमध्ये सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यावर भर दिला जाणार आहे. नागपूर विभागात गेल्या दोन वर्षांपासून तोटा होत असून, तेथे अकार्यकारी विभाग नियंत्रक नेमण्यात आल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आर्थिक आणि वैधानिक अधिकार असलेले अधिकारी आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची योग्य पदस्थापना करून सक्षम नेतृत्व देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनिक शिस्त, संसाधनांचा योग्य वापर आणि जबाबदारी निश्चिती यावर आधारित व्यापक सुधारणा आराखडा लवकरच राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा
लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार
इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय