ह्रदयद्रावक… 7 वर्षांनी बाळ झालं, 21 व्या मजल्यावरुन आईच्या हातातून सुटलं; चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ

पालघर : मुंबई, पुण्यासारख्या महानगरांत जागेच्या अभावी उंचच उंच इमारती उभारल्या जातात. त्यामुळे, मजल्यांवर मजले(Floors) चढललेल्या फ्लॅटमध्ये राहण्याची वेळ नागरिकांवर येते. अशावेळी घरात लहान मुले असतील तर त्यांची मोठी काळजी घ्यावी लागते. कारण, अनेकदा उंच इमारतीवरुन पडल्याने अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

आतात, विरारमध्ये ह्रदयपिळवटून टाकणारी घटना घडली असून 21 व्या मजल्यावरून(Floors) खाली पडल्याने 7 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार 23 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास विरार पश्चिमेकडील जॉय विला कॉम्प्लेक्समधील पिनॅकल सोसायटीत घडली आहे.

विकी सेदानी आणि पूजा सेदानी हे दाम्पत्य पिनॅकल सोसायटीमधील 21 व्या मजल्यावर(Floors) राहत होते. त्यांचा सात महिन्यांचा मुलगा व्रिशांक उर्फ वेद याला झोप येत नव्हती, म्हणून पूजा सेदानी त्याला कुशीत घेऊन मास्टर बेडरुममध्ये फिरत होत्या. बेडरुममध्ये हवा यावी म्हणून त्यांनी बाल्कनीची स्लायडिंग खिडकी उघडी ठेवली होती.

मात्र, अचानक फरशी ओलसर असल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्या थेट बाल्कनीच्या दिशेने पडल्या. या झटक्यात त्यांच्या कुशीत असलेला व्रिशांक हा बाल्कनीतून थेट खाली पडला. या दुर्घटनेनंतर तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सेदानी कुटुंबाला 7 वर्षांनंतर मूल झाले होते, त्यामुळे हा अपघात त्यांच्या आयुष्यात खोलवर रुतलेल्या जखमेसारखा काळा ठसा उमटवणारा ठरला आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सोसायटीत हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक पोलीस तपास करत असून, सदर घटना ही अपघाती असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे. ही घटना पालकांनी लहान मुलांची काळजी घेताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित करते.

अनेकदा उंच इमारतींच्या सोसायटींमध्ये इमारतीच्या खिडकीला ग्रील लावलेले नसते, किंवा गॅलरी, खिडक्या ओपन असल्यानेही रहिवाशांच्या जिवीताला धोका निर्माण होता. त्यामुळे, घरात लहान मुले असताना पालकांनी ही खबरदारी घेणे तितकेच गरजेचे आहे.

हेही वाचा :

‘या’ बाईकचा नादच खुळा ! चक्क कंपनी देतेय कारसारखे फीचर्स

‘सीमा, तुला…’; पहलगाम हल्ल्यानंतर सीमा हैदरच्या पहिल्या नवऱ्याची थेट धमकी

पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांवरील अतिरेकी हल्ल्याचा इचलकरंजीत तीव्र निषेध; शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व विश्वहिंदू परिषदेकडून मोर्चा काढला