हजार कोटींचा खर्च, रस्ते मात्र खड्ड्यांतच?

कोल्हापूर शहरातील रस्‍त्‍यांसाठी १५ वर्षात एक हजार कोटी रुपयांचा खर्च झाला; (potholes) पण आजही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागताे. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत रस्त्यांची अवस्था बिकट होत असून तुंबलेल्या गटारी, निकृष्ट कामे आणि दुर्लक्षित देखभाल यामुळे प्रमुख मार्ग धोकादायक बनले आहेत. दैनिक ‘पुढारी’ने आजपासून सुरू केलेेल्या ‘खड्ड्यांच्या विळख्यात कोल्हापूर!’ या विशेष वृत्तमालिकेत रस्त्यांची वस्तुस्थिती, त्यामागील कारणे आणि जबाबदार यंत्रणांचा वेध घेतला जाणार आहे.

मुंबई – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून तावडे हॉटेलमार्गे शहरात प्रवेश केल्यानंतर कावळा नाका ओलांडताच खड्ड्यांचे साम्राज्य सुरू होते. स्टेशन रोडचा भाग असणारा कावळा नाका चौक ते रेल्‍वे स्‍टेशनपर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे. या मार्गावरून रोज हजारो दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहने ये-जा करतात; मात्र मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वेग कमी करूनच प्रवास करावा लागतो. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात घडत असून दुचाकीस्वारांना सर्वाधिक फटका बसत आहे. चारचाकी वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ तात्पुरती मलमपट्टी होते.

व्हिनस कॉर्नर चौकात मोठी भेग पडली आहे. या ठिकाणी भरधाव वाहनांमुळे दुचाकीस्वारांचा तोल जातो. मागून येणाऱ्या वाहनांची धडक बसण्याचा धोका आहे. व्हिनस कॉर्नर ते दाभोळकर चौक या मार्गावरही अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. (potholes) काही अंतरावरच पुन्हा खड्डा अशी परिस्थिती असल्याने वाहनचालकांची कसरत सुरू असते. दाभोळकर चौक ते ताराराणी चौक या भागातही रस्त्यांची अवस्था वेगळी नाही. दाभोळकर चौक ते रेल्वेस्थानक या मार्गावर विशेषतः शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर मोठे खड्डे पडले आहेत.

या भागात पावसाचे पाणी वारंवार साचत असल्याने डांबरी रस्ता अधिकच उखडत आहे. पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच पाणी साचत आहे. येथे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रस्ते वारंवार खराब होण्यामागे तुंबलेल्या आणि बुजलेल्या गटारी हे एक प्रमुख कारण आहेे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पाणी थेट रस्त्यावरून वाहते. (potholes) डांबरी रस्त्यांवरील डांबर उखडून खड्डे पडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढते. शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा सक्षम न झाल्यास केवळ खड्डे बुजवून हा प्रश्न सुटणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा :

दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?

जंतर-मंतर चे ग्रहण सुटलं

नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?