कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला शुक्रवारी 66 वर्षे झाली. संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणणारे यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा सुमारे हा 66 वर्षांचा कालावधी आहे आणि या कालावधीत महाराष्ट्राने नेमके काय कमावले आणि काय गमावले (Maharashtra state) याचा लेखाजोखा शासकीय पातळीवरच मांडला गेला तर महाराष्ट्र आज नेमका कुठे आहे हे सर्व सामान्य जनतेला कळेल.

मुंबई सह संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबईत आणि महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभे राहिले होते. फ्लोरा फाउंटन येथे झालेल्या उग्र आंदोलनात 105 लोक हुतात्मा झाले, आज या परिसराला हुतात्मा चौक म्हटले जाते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची घोषणा दिनांक एक मे 1960 रोजी झाली. घोषणा करण्याचा हा निर्णय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यालयात झाला तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत एक मराठी पत्रकार सुद्धा तिथे उपस्थित होते. मराठी भाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी सहकार, लोकशाही विकेंद्रीकरण, कृषी औद्योगिक समाजव्यवस्था या त्रिसूत्रीवर राज्याचे धोरण ठरवले.
आणि त्यामुळेच औद्योगिक, कृषी, सांस्कृतिक क्षेत्रात आज महाराष्ट्रात देशात आघाडीवर राहिला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही गुजरात मध्ये जाण्याची तेव्हा भीती होती. पण मुंबई सह महाराष्ट्र मिळाला ही मोठी कमाई म्हणावी लागेल. स्वतंत्र राज्याच्या निमित्ताने स्वतंत्र प्रशासकीय रचना महाराष्ट्राला मिळाली की ज्यामुळे विकासाला चालना मिळत गेली. आज संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे आर्थिक क्षेत्रात अव्वल स्थानी आहे. विशेषतः गेल्या 40 वर्षात परदेशी कंपन्यांनी इथे मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आहे.
गेल्या 65 वर्षात महाराष्ट्राने काय कमावले याचा लेखाजोखा मांडण्यासाठी एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. इतके म्हणता येईल की मोठा संघर्ष करून महाराष्ट्राने देशांमध्ये आपली ओळख बनवली आहे. बेळगाव, कारवारसह सीमा भाग आजही आपण गमावलेला आहे. तो मिळवण्यासाठी आजही अधून मधून आंदोलने करावी लागतात. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण येथे विकासाचा समतोल अद्यापही राखता आलेला नाही. मराठवाड्याच्या दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करता आलेली नाही.
हाराष्ट्रातील किमान 30 टक्के शेती सिंचनाखाली आणता आलेली नाही. अलीकडच्या काळात त्यासाठी 70 हजार कोटी रुपयांचा खर्च झाला पण सिंचन क्षेत्र काही वाढले नाही. कापूस वगळता शेतकऱ्यांच्या कृषी मालाला हमीभाव मिळालेला नाही, मिळत नाही. उत्पादन खर्चाशी निगडित अद्याप उसाला सुद्धा दर दिला जात नाही. एकूणच शेतकरी आज आर्थिकदृष्ट्या मागास राहिला आहे. पिकासाठी कर्ज काढायचे आणि पिकवलेल्या कृषी मालाला बाजार भाव मिळत नाही म्हणून मग कर्जबाजारी व्हायचे.
वित्तीय संस्थांनी वसुलीचा तगादा लावला की गळफास लावून घ्यायचा, हे राज्याच्या शेतकऱ्याचे प्राक्तन आहे. गेल्या दोन अडीच महिन्यात 217 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आत्महत्यांचे सत्र काही थांबता थांबेना. केंद्र शासनाने एकदा आणि राज्य शासनाने दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली आहे. पण ही गंभीर दुखण्यावरची साधी मलमपट्टी ठरते आहे. शेतकऱ्याचा सातबारा उतारा कायमस्वरूपी कोरा राहिला पाहिजे, यासाठी कृषी धोरण
ठरवले पाहिजे.
इसवी सन 2019 मध्ये महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात सरकार होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते होते. फडणवीस यांनी एका सर्वेक्षणाचा आधार घेऊन महाराष्ट्रातील पाच लाख शेतकऱ्यांच्या मनात सध्या आत्महत्या करण्याचे विचार घोळत आहेत असे विधिमंडळात बोलताना सांगितले होते. त्याआधी फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि सध्या तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. पण त्यांनी शेतकऱ्यांच्या मनातील आत्महत्येचे विचार दूर होतील असे प्रयत्न केले नाहीत असे नाही पण त्यांना त्यात यश आलेले दिसत नाही हे नक्की. आणि म्हणूनच आत्महत्येचे सत्र सुरूच आहे.
ज्या राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतो ते राज्य देशात आघाडीवर आहे असे कसे म्हणता येईल? सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटलेले आहेत असेही चित्र नाही. देशामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे तर मग राज्यातील बीपीएल कुटुंबांची संख्या रोज वाढताना का दिसते आहे? आणि म्हणूनच गेल्या 60 65 वर्षात महाराष्ट्राने काय कमावले आणि काय गमावले याबद्दलची एक श्वेतपत्रिका महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी प्रसिद्ध केली पाहिजे. त्यानंतरच आपण नेमके कोठे आहोत हे सर्वसामान्य जनतेला कळू शकेल.
हेही वाचा
मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी
मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?
गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल