कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात “गोकुळ”या सुमारे पाच हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या संस्थेवर आपली सत्ता असली पाहिजे
असे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक राजकारण्याला वाटत असते. (Milk producers) त्यासाठी स्थानिक पातळीवर राजकारण आणि सत्ताकारण सुरू असते. पण गेल्या दीड दोन वर्षांपासून स्थानिक पातळीवरचे राजकारण थेट मंत्रालयात आणि मंत्रालयातील सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले आहे.

महाराष्ट्रात आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणाचे संदर्भ पूर्णपणे बदलले. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांचे राजकीय समीकरण बदलले. त्याला कोल्हापूर जिल्हाही अपवाद नाही. जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हेच राहिले. सव्वा वर्षांपूर्वी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे राजीनामा प्रकरण मुंबई पर्यंत पोहोचले. त्यावर महायुतीमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप केला आणि हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीन मुश्रीफ यांच्यावर गोकुळच्या अध्यक्षपदाचा दुग्धाभिषेक करण्यात आला.
गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कालावधी जवळपास पूर्ण झाला आहे. नव्याने पंचवार्षिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. पण मध्येच मतदार असलेल्या काही दूध संघाचे प्रकरण न्यायालयात गेले आणि निवडणूक प्रक्रियेला खो बसला. एकूणच गोकुळ दूध संघाची होणार असलेली संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक, या निवडणुकीत पॅनल बनवण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील विकोपाला गेलेला वाद, हसन मुश्रीफ यांच्याकडून भाजपाला थोड्या अंतरावर ठेवण्याचे सुरू असलेले डावपेच, आणि महायुती म्हणून ही निवडणूक लढवली गेली पाहिजे हा शिवसेनेने धरलेला आग्रह या पार्श्वभूमीवर गोकुळच्या दुधाला राजकीय उकळी फुटली आहे.
आता गोकुळ प्रकरणात महायुतीच्या नेत्यांनी अर्थात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी लक्ष घातले आहे. गोकुळच्या निवडणुकीचा तिढा आता मुंबईत सोडवला जाणार आहे. तसा तो सोडवला जाईलही. पण हे सर्व प्रथमच घडत आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि अर्थतज्ञ वि. म. दांडेकर यांनी सहकारात राजकारण आणू नये किंबहुना राजकारणापासून सहकार क्षेत्र दूर ठेवले पाहिजे असा मोलाचा सल्ला सहकार क्षेत्राला दिला होता. महाराष्ट्रात आणि देशात खऱ्या अर्थाने सहकार रुजला तो कोल्हापूर जिल्ह्यात आणि म्हणूनच त्याला सहकार पंढरी म्हटले जाते.
गोकुळच्या स्थापनेनंतर काही वर्षे ही संस्था राजकारणापासून दूर होती किंवा संचालक मंडळावर राजकारणी असूनही त्यांनी दूध संघाला राजकारणाची लागण होऊ दिली नव्हती. पण हा दूध संघ महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात गेल्यानंतर तेथे राजकारणाला उकळी फुटली. आनंदराव पाटील चुयेकर हे गोकुळचे बरीच वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी हा दूध संघ राजकारणापासून अलिप्त ठेवला होता. महाडिक आले आणि हा दूध संघ राजकारणांच्या हाती गेला. तिथे राजकारण सुरू झाले. काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ या दोघांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत महाडिक गटाचा पराभव केला.
आणि सर्व सूत्रे काँग्रेस आघाडीकडे गेली. आता मात्र गोकुळ दूध संघात महायुतीने थेट हस्तक्षेप केला आणि आता गोकुळचे सत्ताकारण आणि राजकारण मंत्रालयात आणि मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले आहे. गोकुळचे भवितव्य मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यावरून आता ठरवले जाणार आहे किंवा ठरवले
जात आहे. एकूणच गोकुळचे सत्ताकारण आणि राजकारण बदलत चालले आहे. शासकीय दुग्ध संस्था असताना आनंदराव पाटील चुयेकर, यांनी पुढाकार घेऊन कोल्हापूर जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघाची स्थापना केली अर्थात गोकुळ ची सुरुवात केली. वर्गीस कुरियन यांचे मार्गदर्शन घेतले.
त्यांच्याच मदतीने “दुधाचा महापूर”योजना राबवली आणि गोकुळ दूध संघाचा विकास आणि विस्तार केला. आज दूध संघाची व्यापारी उलाढाल वार्षिक 5000 कोटी पर्यंत पोहोचली आहे. गोकुळ दूध संघ ताब्यात असला म्हणजे जिल्ह्याचे राजकारण करता येते किंवा राजकारणात मोठी झेप घेता येते असे या दूध संघाचे नेतृत्व करणाऱ्या राजकारण्यांनी सिद्ध केले आहे आणि म्हणूनच गोकुळ दूध संघावर संचालक म्हणून जाण्यासाठी अनेक राजकारण्यांची धडपड सुरू असते. जिल्ह्याच्या राजकारणात जे प्रस्थापित झाले आहेत त्यांनी आपल्या वारसदारांना गोकुळ दूध संघावर संचालक म्हणून पाठवले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय वारस हा दूध संघाच्या माध्यमातून ठरवला जातो असे म्हणता येईल.
हेही वाचा
अरविंद केजरीवाल यांचा …….न्यायासाठी सत्याग्रह ?.
पोलादी सुरक्षा व्यवस्था …..जेव्हा भेदली जाते…
‘राजा शिवाजी’मधील लहान मुलाच्या त्या सीनवर कात्री सेन्सॉर बोर्डाने सुचवले हे मोठे बदल