बारामतीत सुरू असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेवरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळालेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेत गंभीर तक्रार नोंदवली आहे.

सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात पुणे महापालिका (political) प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांची करण्यात आलेली पुनर्रचना ही नागरिकांच्या सोयीसाठी नसून राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या बदलांमुळे अनेक नागरिकांना दैनंदिन कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने तांत्रिक निकषांचा विचार न करता दिशाहीन निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या नव्या रचनेमुळे स्थानिक राजकारणातही मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या सीमांकनानंतर १५ पैकी १४ प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व निर्माण होणार असल्याचा दावा करत, राष्ट्रवादी काँग्रेसला जाणीवपूर्वक सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रशासनाचा वापर केल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे. महापालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ मोठे असतानाही त्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याने हा मुद्दा अधिकच संवेदनशील बनला आहे.
दरम्यान, या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नगर विकास विभागाला हालचाली करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिका आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून पुनर्रचना करताना कोणते निकष वापरण्यात आले, नियमांचे पालन झाले का आणि या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप झाला का, याची सखोल चौकशी केली जाणार आहे.
आता प्रशासनाकडून सादर होणाऱ्या अहवालावर या वादाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. बारामतीतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभा राहिलेला हा मुद्दा राज्यातील राजकारणात आणखी तापमान वाढवण्याची चिन्हे दिसत असून आगामी काळात यावरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा;
एसटी प्रवास महागणार, हंगामी वाढ १५ एप्रिलपासून; किती रुपयांनी वाढले आकडेवारी आली
सहलीला गेली अन् घात झाला, 15 वर्षांच्या मुलीचा दरीत सापडला मृतदेह, पालकांनो ‘या’ 5 चुका टाळा
८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, कोणत्या फॉर्म्युलानुसार पगार किती रुपायांनी वाढणार?