पाकिस्तानकडून सुरू असलेल्या भडकाऊ आणि युद्धछेडीच्या वक्तव्यांवर भारताने गुरुवारी कडक शब्दात प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने आपल्या वक्तव्यावर नियंत्रण ठेवावे, तसेच नको ते धाडस करू नये, अन्यथा त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असा कडक इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. भारताचा हा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या वक्तव्यांनंतर देण्यात आला. शरीफ यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते, की, भारत आमचं पाणी अडवणार असेल तर त्याला योग्य तो धडा शिकवला जाईल.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जण ठार झाल्यानंतर भारताने 23 एप्रिल रोजी सिंधू पाणी वाटप करार (Indus Waters Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही अशी भारताने भूमिका घेतली. त्यावर पाण्याचा प्रवाह रोखणे म्हणजे युद्ध समजले जाईल, असं वक्तव्य पाकिस्तानने केलं होतं.

पाकिस्तानची भाषा युद्धखोरीची

पाकचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांनी या निर्णयाची तुलना ‘सिंधू संस्कृतीवर हल्ला’ असा करत पाकिस्तान युद्धाला तयार असल्याचा इशारा दिला होता. या वादात भाजप नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्तीही उतरले. भारत ब्रह्मोस क्षेपणास्त्रांने पाकिस्तानला उत्तर देईल अशा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, पाकिस्तानी सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अमेरिकेतल्या टॅम्पा, फ्लोरिडा येथील कार्यक्रमात म्हटले होते की, “भारत पाणी अडवण्यासाठी धरण बांधल्यास ते आम्ही नष्ट करू. सिंधू नदी ही भारताची कौटुंबिक मालमत्ता नाही.”

भारतानं मुनीर यांच्या वक्तव्यावर टीका करत त्याला ‘अण्वस्त्रांची धमकी देण्याचा प्रयत्न’असल्याचा दावा केला. तसेच भारताने पाकिस्तानच्या आण्विक कमांडच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमेरिकेच्या भूमीवरुन पाकिस्ताने युद्धाची भाषा केली असं सांगत भारताने नाराजी व्यक्त केली.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी ठिकाणांवर भारताने कारवाई केली होती. त्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्यानंतर 10 मे रोजी दोन्ही देशांनी संघर्ष थांबवण्याचा निर्णय घेतला.