बॉलिवूडमधील सर्वात चर्चित आणि ग्लॅमरस दांपत्य म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन. सिनेसृष्टीत त्यांच्या नात्याबद्दल, कामाबद्दल आणि कुटुंबाबद्दल नेहमीच चर्चा रंगत असते. मात्र यावेळी या दांपत्याने एका गंभीर कारणामुळे कोर्टाचं दार ठोठावलं आहे. अलीकडेच ऐश्वर्यानंतर आता अभिषेक बच्चननेही दिल्ली उच्च न्यायालयात(court)याचिका दाखल केली असून, त्यामागचं कारण डिजिटल गैरवापराशी संबंधित आहे.

ऐश्वर्याची याचिका
सर्वात आधी ऐश्वर्या राय बच्चनने वैयक्तिक हक्क आणि प्रतिमेच्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली. तिचा दावा आहे की अनेक वेबसाइट्स आणि पोर्टल्स तिचे फोटो व व्हिडिओ तिच्या परवानगीशिवाय वापरत आहेत. काही प्रकरणांत हे फोटो चुकीच्या संदर्भात किंवा दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने सादर केले जात आहेत. यामुळे तिच्या प्रतिमेला धोका निर्माण होतो, असं अभिनेत्रीचं म्हणणं आहे.
अभिषेकचा गंभीर आरोप
याच पाठोपाठ, अभिषेक बच्चननेही न्यायालयाकडे(court) धाव घेतली. त्याच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रवीण आनंद यांनी न्यायालयाला सांगितलं की, काही वेबसाइट्स आणि सोशल मीडिया अकाउंट्स अभिषेकचे बनावट फोटो, व्हिडिओ आणि डीपफेक्स तयार करून प्रसारित करत आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी काही कंटेंटमध्ये त्याच्या नावाशी जोडून अश्लील साहित्य तयार करण्यात आलं आहे.
अभिषेकच्या वकिलाने ठामपणे सांगितलं ‘हे आदेश काळाची गरज आहेत. एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सेलिब्रिटींना लक्ष्य केलं जातंय. या माध्यमातून केवळ त्यांच्या प्रतिमेवर डाग लागत नाही, तर त्यांच्या वैयक्तिक गोपनीयतेचाही भंग होतो. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे.’
न्यायालयातील सुनावणी
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या समोर सुरू आहे. बुधवारी सकाळी प्राथमिक चर्चा झाली असून दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायालयाने अभिषेकच्या वकिलाला बनावट कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या वेबसाइट्सची यादी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
याआधीही सेलिब्रिटी कोर्टात
ही पहिली वेळ नाही की सेलिब्रिटींनी आपल्या डिजिटल हक्कांच्या संरक्षणासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. काही महिन्यांपूर्वी अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनीही अशाच प्रकारे याचिका दाखल केली होती. त्यांच्या प्रतिमेचा, आवाजाचा आणि डिजिटल स्वरूपाचा गैरवापर थांबवण्यासाठी त्यांनी न्यायालयीन मदत घेतली होती.
डिजिटल युगातील नवी समस्या
एआय आणि डिजिटल एडिटिंग साधनांच्या वाढत्या वापरामुळे डीपफेक व्हिडिओ, खोटे फोटो आणि दिशाभूल करणारा कंटेंट वेगाने पसरू लागला आहे. यामुळे फक्त सामान्य लोकच नव्हे, तर सेलिब्रिटी आणि सार्वजनिक व्यक्तीमत्त्वे यांच्याही प्रतिमेवर गंभीर परिणाम होतो. बच्चन दांपत्याच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा “सेलिब्रिटींचे डिजिटल हक्क आणि गोपनीयता” या मुद्द्यावर चर्चा रंगू लागली आहे.
चाहत्यांमध्ये उत्सुकता
बच्चन दांपत्याने घेतलेल्या या कायदेशीर पावलामुळे चाहते आणि इंडस्ट्रीतील लोकांमध्येही उत्सुकता वाढली आहे. “नेमकं कोर्ट काय निर्णय देईल?”, “सेलिब्रिटींना भविष्यात डिजिटल संरक्षण कसं मिळणार?” या प्रश्नांची आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे.
हेही वाचा :
बार डान्सरसोबत पोलीस अधिकाऱ्याचा अश्लील डान्स; Video Viral
मोठी बातमी! भाजपला दे धक्का, 8 नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Asia Cup 2025 सामन्यांची रंगत अजूनच वाढणार, कॉमेंट्री पॅनलमध्ये ‘या’ दिग्गजांचा समावेश