महाराष्ट्रात रस्ते विकासाच्या कामांना वेग आला असून राज्य सरकारकडून एक आणखी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांना जोडणारा विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर या प्रकल्पाला आता हिरवा कंदील मिळाला आहे. या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पासाठी तब्बल ₹37,013 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात रस्ते(highway) विकास युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या महानगरांमध्ये दळणवळण सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. अशातच आता मुंबईसाठी आणखी एक नवा महामार्ग प्रकल्प सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्य सरकारकडून या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याला नवघर ते बालवली (96.4 किमी) मंजुरी देण्यात आली आहे. हा टप्पा बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर पद्धतीवर उभारला जाणार असून, यासाठी हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून कर्ज घेतले जाणार आहे. राज्य सरकार स्वतः या कर्जासाठी हमीदार राहणार आहे.या टप्प्यासाठी २२,२५० कोटी रुपये भूमी अधिग्रहणासाठी, तर १४,७६३ कोटी रुपये व्याजासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी गेल्या वर्षी EPC मॉडेलवर निविदा मागवण्यात आल्या होत्या, मात्र त्या अपेक्षेपेक्षा महाग ठरल्याने प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता BOT पद्धतीवर प्रकल्प पुन्हा सुरू केला जाणार आहे.

भूमी अधिग्रहणाचे काम सध्या सुरू असून, अतिरिक्त निधी मिळाल्याने ही प्रक्रिया गतीमान होईल अशी अपेक्षा आहे. या महामार्गामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांना थेट जोडणारा वाहतूक मार्ग(highway) तयार होईल. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल.विशेष म्हणजे, या महामार्गाच्या पॅकेज-6 टप्प्याचे महत्त्व सर्वाधिक आहे कारण यातून दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या JNPT स्परचा संपर्क मुंबई-पुणे एक्सप्रेसवेशी जोडला जाणार आहे. यामुळे औद्योगिक वाहतूक, लॉजिस्टिक नेटवर्क आणि उपनगरांमधील संपर्क अधिक मजबूत होईल.

राज्य सरकारच्या दाव्यानुसार, या प्रकल्पामुळे केवळ वाहतूकच नव्हे तर प्रादेशिक विकास, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक वाढ यांनाही मोठा हातभार लागणार आहे. हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर मुंबई परिसरातील औद्योगिक क्षेत्रांना थेट फायदा होईल.
विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर हा प्रकल्प राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांपैकी एक ठरणार असून, पुढील काही वर्षांत महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेचे स्वरूप पूर्णपणे बदलणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा :

सावधान! लाखो Android युजर्सना सरकारचा तातडीचा इशारा…
आज सिंह गवत चरत होता” म्हणत सूर्यकुमारने ‘या’ अव्वल खेळाडूची उडवली खिल्ली Video व्हायरल
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार!