कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : अरुण कुमार डोंगळे यांच्या नाराजीनामा नाट्यातून अगदी अकल्पितपणे नवीद मुश्रीफ यांच्यावर अध्यक्षपदाचा दुग्धाभिषेक करण्यात आला. महायुतीच्या पंखाखाली हा दूध संघ आल्याचे तेव्हा मानले गेले. मागच्या दाराने येऊन महाडिक गट सत्यता आला असेही बोलले जाऊ लागले. त्यामुळे गोकुळ(Gokul) मधील “व्यवस्थे”ला गेल्या चार वर्षांपासून प्रश्न विचारणाऱ्या शौमिका महाडिक ह्या मंगळवारी सर्वसाधारण सभेत कोणती भूमिका घेणार याबद्दल कमालीची उत्सुकता लागून राहिली होती पण त्यांनी गोकुळच्या वार्षिक सभेत नेहमीप्रमाणे विरोधक म्हणून भूमिका निभावली.

गोकुळ(Gokul) दूध संघात शेवटच्या वर्षात विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. महाडिक गटाकडून हा संघ काढून घेताना काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी संघटन कौशल्य कमालीच्या पातळीवर वापरले होते. पाटील आणि मुश्रीफ यांच्याकडे सत्ता सूत्रे आली होती. दोघेही तेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांनी पाडले आणि राजकारणाचे संदर्भ पूर्णपणे बदलले. त्याचे पडसाद गोकुळ मध्येही उमटले. सतीश पाटील हे एकाकी पडले. महायुतीची सत्ता गोकुळ मध्ये आली असे सांगितले जाऊ लागले. परिणामी शौमिका महाडिक ह्या एका अर्थाने सत्तेत आल्या. त्यांनी मंगळवारच्या वार्षिक सभेत युती धर्म पाळावा असे नवीद मुश्रीफ यांनी आवाहन केले होते.
प्रत्यक्षात मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या व्यासपीठावर न बसता समोर दूध संघाच्या सदस्यांमध्ये जाऊन बसल्या. त्यांनी नेहमीप्रमाणेच गोकुळच्या व्यवस्थापनाला अनेक प्रश्न विचारून धारेवर धरले. संचालक संख्या वाढीला त्यांनी विरोध दर्शवला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली पाहिजेत असा आग्रह धरला. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या प्रश्नांना उत्तरे न देता ही वार्षिक सभा” चटावरच्या श्राद्धा “प्रमाणे उरकण्यात आली. त्यामुळे काही वेळ या बैठकीत गोंधळ उडाला.
अमल महाडिक हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. धनंजय महाडिक हे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे शौमिका महाडिक या सुद्धा भाजपच्या समजल्या जातात. गोकुळ(Gokul) मध्ये महायुतीची सत्ता असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र गोकुळ संघाच्या अहवालात भाजपला स्थान नव्हते. गोकुळ दूध संघ महायुतीच्या प्रभावाखाली आहे असे वातावरण या वार्षिक सभेत दिसले नाही.
शौमिका महाडिक यांनी व्यासपीठावर बसण्यास नकार दिला, समोरच्या सभासदांच्या पहिल्या रांगेत बसण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ त्यांच्या या भूमिकेला त्यांच्या कुटुंबीयांकडून समर्थन होते असा होतो. महाडिक कुटुंबीयांना गोकुळमध्ये महायुतीची सत्ता नाही असे सुचित करावयाचे दिसते.
सतेज पाटील यांच्या मर्जीप्रमाणे दरवर्षी अध्यक्ष बदलला जात होता. शेवटच्या वर्षी त्यांना स्वतःच्या विश्वासू कार्यकर्त्याला संधी द्यावयाची होती पण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी गोकुळच्या राजकारणात हस्तक्षेप करून नवीद मुश्रीफ यांच्याकडे अध्यक्ष पदाची धुरा सोपवली. त्यामुळे सतेज पाटील यांचे गोकुळ दूध संघातील वर्चस्व संपले असे मानले जात होते मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभेला मात्र हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हे एकत्रच सभेच्या ठिकाणी आले आणि शेजारीच बसले. गोकुळ मध्ये आम्ही दोघेही आत्ताही एकत्र आहोत असा संदेश मुश्रीफ यांना द्यावयाचा असावा.
हेही वाचा :
बार डान्सरसोबत पोलीस अधिकाऱ्याचा अश्लील डान्स; Video Viral
मोठी बातमी! भाजपला दे धक्का, 8 नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Asia Cup 2025 सामन्यांची रंगत अजूनच वाढणार, कॉमेंट्री पॅनलमध्ये ‘या’ दिग्गजांचा समावेश