राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृष्य परिस्थितीमुळे मोठ्याप्रमाणात शेतमालाचं नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी(Farmer) हवालदील होऊन स्वत:ला संपवल्याच्या घटना समोर येत असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सध्या राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी शेतकऱ्यांचा(Farmer) प्रश्न असून नाशिकमध्ये दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चामधून शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फडणवीस सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असा इशारा देताना आंदोलन अधिक तीव्र करण्यासंदर्भात भाष्य केलं.

यावरुन भाजपाकडून आता शरद पवार कृषीमंत्री असताना काय झालं याची आकडेवारी मांडून टीका केली जात असतानाच प्रत्यक्षात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलाय.

शेतात नुकसानीचा पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याने(Farmer) महसूल अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पैठण तालुक्यातील खादगाव येथे ही हदयद्रावक घटना घडली आहे. मयत शेतकऱ्याचं नाव संजय शेषेराव कोहकडे असे असल्याची माहिती समोर आली आहे.

शेताच्या दोन्ही बाजूंने पाटाचे खोदकाम झाल्याने 45 वर्षीय संजय कोहकडे यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नव्हता. तसेच यामुळेच त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागले. त्यांनी याबाबत अनेकदा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मंगळवारी अधिकारी पंचनामा करत असताना संजय कोहकडे यांनी आपली व्यथा सांगितली.

आधीच नुकसान आणि अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असलेल्या या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांनी संजय कोहकडेंनाच झापल्याने ते संतापले. त्यांनी या अधिकाऱ्यांसमोरच थेट विहिरीकडे धाव घेत अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी घेतली. काहींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मदत पोहोचेपर्यंत पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून शेतकऱ्यांबद्दल अधिकाऱ्यांनी थोडी संवेदनशीलता दाखवली असती तर आज शेतकऱ्याचा जीव वाचला असता असं स्थानिकांचं म्हणणं आहे. आता या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी कारवाई होणार का याबद्दलची चर्चा गावकऱ्यांमध्ये असल्याचं दिसत आहे.

शेतकऱ्यांप्रती उदासीन सरकार असं यापूर्वी कधीच आलं नाही, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना म्हटलं होतं. “कर्जमाफी दिली नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि आता अस्मानी संकट आलं आहे. सोयाबीनचा तातडीने सर्वेक्षण करण्याची गरज आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. नाहीतर आत्महत्या पुन्हा वाढतील. सरकारने तातडीने पंचनामे करून तो मदत दिली पाहिजे,” अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

हेही वाचा :

Vitamin C मुळे पोट, फुफ्फुस आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका होईल कमी

‘भगवा पार्टीला हवाय मुस्लीममुक्त भारत…’ भाजप आसामचा Video पाहून भडकले ओवेसी

मलाइका अरोराच्या वैयक्तिक आयुष्यातील धक्कादायक खुलासा