कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
गणेश उत्सव हा अभूतपूर्व उत्साहाचा सण(festival) समजला जातो. या दहा दिवसांच्या काळात माणूस नेहमीच्या ताणतणावापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आनंद पर्वांला यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिका निवडणुकांचे तोरण लागले आहे. लोकप्रतिनिधींचा, मंत्र्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग या उत्सवात असणार आहे. इच्छुकांच्याकडून उमेदवारीची मोर्चे बांधणीही याच काळात केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून कार्यकर्त्यांच्या उत्साहाला नियमांच्या चौकटीत नियंत्रित केले जाईल पण उत्साही कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींचे बळ मिळणार असल्याने नियम तंतोतंत पाळले जाणार नाहीत. किंबहुना नियमांची चौकट मोडली जाण्याची यंदा जास्त शक्यता असल्याने पोलीस प्रशासनावरील ताण वाढणार आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत असलेला गणेशोत्सव(festival) उत्साहाने साजरा करताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, धार्मिक सलोख्याला गालबोट लागू नये, सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवनही विस्कळीत होऊ नये. यासाठी पोलीस प्रशासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात आहे. गणेशोत्सव दणक्यात, जल्लोषात साजरा करा पण मार्गदर्शक सूचनांचे, नियमांचे काटेकोरपणे पालन करा. उत्साहाचा अतिरेक असू नये अशा प्रकारचे समुपदेशन पोलीस प्रशासनाकडून केले जाऊ लागले आहे. पण तरीही यंदाच्या गणेशोत्सवात शेवटच्या तीन दिवसात पोलिसांना कमालीची सहनशीलता बाळागावी लागणार आहे. त्यांचा” कस”या काळात लागणार आहे. कारण यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि प्रत्येक राजकीय पक्षाला, पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विजयाचे तोरण बांधावयाचे आहे आणि त्यासाठी त्यांचाही पोलीस प्रशासनावर अप्रत्यक्ष दबाव असणार आहे.
पोलीस प्रशासनावरचा ताण कमी व्हावा म्हणून सुमारे 25 वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक माधव सानप यांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात “एक गाव एक गणपती, एक प्रभाग एक गणपती”ही संकल्पना मांडली होती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून या संकल्पनेला बळ मिळाले होते. अजूनही काही गावात ही संकल्पना रुजलेली आहे.
पण त्यानंतर ही संकल्पना रुजवण्याचे प्रयत्न फारसे झाले नाहीत आणि त्यामुळे ही संकल्पनाच आता मागे पडत चालली आहे.
कोल्हापूर शहराचे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपात घेतले तर येथे पेठा पेठांमध्ये सार्वजनिक तरुण मंडळे आहेत, तालीम संस्था आहेत, प्रत्येक मंडळाला स्वतःची वास्तू आहे. तथापि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे बहुतांशी मंडळांना त्यांच्या श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना रस्त्यावर उभारण्यात आलेल्या मांडवामध्ये करावी लागते आहे.

राजारामपुरी किंवा इतर काही मोठ्या उपनगरांचे रस्ते मोठे प्रशस्त आहेत. पण शहरातील रस्ते फारसे रुंद नाहीत. परिणामी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या मांडवामुळे वाहतुकीचे काही प्रश्न तयार होतात. आणि हे प्रश्न प्रभावीपणे सोडवता येतात असे नाही. स्थानिक प्रशासन त्या दृष्टीने हतबल असते.कोल्हापूर शहर आणि आसपासच्या परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पोलिसांच्या दप्तरी असलेली संख्या दीड हजार पेक्षा अधिक आहे. ती दरवर्षी वाढतच असते.
राज्यातील इतर महानगरामध्ये गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून श्री समोर आकर्षक सजावटी केल्या जातात, विद्युत रोषणाई केली जाते, देखावे मांडले जातात,अपवाद फक्त कोल्हापूरचा आहे. येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कडून सजीव निर्जीव देखावे, विद्युत रोषणाई, आकर्षक सजावटी या शेवटच्या तीन दिवसात लोकांना पाहण्यासाठी खुल्या केल्या जातात. त्यामुळे शेवटच्या तीन दिवसातच सर्वसामान्य लोक गणेश उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडत असतात.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून, पोलीस प्रशासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या साठी नियमावली जाहीर केली जाते. त्यामध्ये ध्वनी प्रदूषण किंवा ध्वनी नियंत्रण हा प्रामुख्याने कळीचा मुद्दा असतो. आता त्यामध्ये लेसर किरणांचा समावेश झालेला आहे. गणेशोत्सव काळात डॉल्बी किंवा डीजे या सिस्टीम मध्ये आवाजाची किती तीव्रता असावी याचे नियम हे न्यायालयानेच लागू केलेले आहेत, आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असल्यानेयाच मुद्द्यावरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि बंदोबस्तावरील पोलीस यांच्यात वादावादीचे प्रसंग निर्माण होतात.
ध्वनी प्रदूषण केल्याबद्दल,ध्वनि नियंत्रणाबद्दलचे कायदे मोडल्याबद्दल दरवर्षी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जाते. त्यातूनचतणावपूर्ण स्थिती निर्माण होते. नियम मोडणाऱ्या मध्येकाही सराईत गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेऊन, त्यांचे प्रभावीपणे समुपदेशन करावे लागेल.
सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये कोल्हापूर शहर किंवा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असे अगदी क्वचितच घडलेले आहे. गणेशोत्सव काळामध्ये मंडळांच्यासाठी लावण्यात आलेले नियम हे बहुतांशी मंडळांच्या कडून पाळले जातात. शहरातील काही श्रीमंत मंडळे आहेत. ते या उत्सवावर अफाट पैसे खर्च करतात. त्यांच्याकडून मंडळाच्या श्रीमंतीचे प्रदर्शन केले जाते आणि त्यांच्याकडून कळत नकळतपणे नियमांचे उल्लंघन होते.
तेथेच पोलीस प्रशासनाची कसोटी खऱ्या अर्थाने लागते. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा, यापूर्वीचा धांडोळा घेतला तर यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव बंदोबस्ताचे व्यवस्थापन करण्यात त्यांना अडचण येणार नाही. यंदा प्रथमच महायुती सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवालाराज्य महोत्सवाचा दर्जा दिल्या असल्यामुळे स्थानिक प्रशासनाचे जबाबदारी आणखी वाढलेली आहे.
हेही वाचा :
या भारतीय खेळाडूने घेतला संघ सोडण्याचा निर्णय
मीराबाई चानूचं जबरदस्त पुनरागमन! राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक
आनंदाची बातमी! महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार १ लाख २२ हजार रुपये