कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

गेल्या काही वर्षांपासून जिल्हा मर्यादित असलेले कोल्हापूरचे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय प्रादेशिक बनत चालले आहे. आणि आता तर त्याची “सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल” (Hospital)च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्याचं आरोग्य सुधारतय. 70 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक एम आर आय मशीन आणले असून 24 तास मोफत स्कॅनिंग सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णांची लुट करणारी काही दुकाने बंद होण्याची शक्यता आहे.आरोग्य मंत्री म्हणून दिग्विजय खानविलकर यांनी कोल्हापूरसाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.सीपीआर रुग्णालयाला त्यांनी आपले दुसरे निवासस्थानचं मानले होते. अमेरिकेच्या अध्यक्षाच्या आरोग्य सेवेत ज्या कंपनीची व्हेंटिलेटर मशीन वापरली जातात त्याच कंपनीची 18 व्हेंटिलेटर मशीन त्यांनी तेव्हा सीपीआर साठी खरेदी केली होती. पण नंतर ती अगदी अल्पकाळात (बंद पाडण्यात आली) बंद पडली.

कोविड काळात पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हती म्हणून काही रुग्णांना प्राण गमवावे लागले होते.त्यावेळीखानमिलेकर यांच्या कार्यकाळात खरेदी केलेली व्हेंटिलेटर मशीन गेली कुठे असा प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्याचे समाधानकारक उत्तर व्यवस्थापनाकडे नव्हते.दहा कोटी रुपये किमतीचे स्कॅनिंग मशीन सीपीआर(Hospital) साठी खरेदी करण्यात आले होते. त्यासाठी एका तज्ञाची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचा लाभ रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात हे मशीन नादुरुस्त झाले की नाद दुरुस्त करण्यात आले? हे समजायला मार्ग नव्हता. पण नंतर हे स्कॅनिंग मशीन दुरुस्तच झाले नाही किंवा ते दुरुस्त होत नाही यासाठीच प्रयत्न झाले. ही सुविधा बंद झाल्यानंतर रुग्णांना खाजगी क्षेत्रातील ही सुविधा महागड्या दराने घ्यावी लागली.


सीपीआर रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया झाल्या पाहिजेत यासाठी दिग्विजय खानविलकर यांनी मुंबईतील जे जे रुग्णालयाचे हृदयविकार तज्ञ डॉक्टर कोले यांच्या सहकार्याने हृदय विकार उपचार केंद्र (कार्डिया लॉजिक सेंटर) सुरू केले. कोल्हापुरातील हृदय विकार रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुणे किंवा मुंबई येथे जावे लागत असे. तेथेही त्यांना प्रतीक्षा यादीवर ठेवले जायचे. कोल्हापुरात हे केंद्र सुरू झाल्यानंतर डॉक्टर कोले यांनी दर महिन्याला काही दिवस कोल्हापुरात येऊन हृदय शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली होती.चांगले चाललेले सीपीआर रुग्णालयातील हृदय विकार उपचार केंद्र अधून मधून बंद पडू लागले.सीपीआर रुग्णालयाचे”हृदय”चालू ठेवण्यासाठी अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते आहे. परिणामी खाजगी रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागांची चलती सुरू आहे. सीपीआर रुग्णालयातील हृदयविकार उपचार केंद्र आजही पुरेशा क्षमतेने चालू आहे असे म्हणता येणार नाही.


आता कोल्हापूर जिल्ह्याचेच प्रकाश आबिटकर हे आरोग्यमंत्री आहेत आणि त्यांनी सरकारी क्षेत्रातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यांच्याच कारकिर्दीत सीपीआर रुग्णालयात 70 कोटी रुपये किमतीचे एमआरआय मशीन रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे. विशेष म्हणजे ही सुविधा 24 तास सुरू असणार आहे आणि ती पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील महागड्या दराचे एम आर आय स्कॅनिंग सामान्य रुग्णांना करावे लागणार नाही. खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील महागड्या दराचे हे दुकान आता बंद होण्याची शक्यता आहे पण त्याचबरोबर काही मंडळींच्याकडून सत्तर कोटी रुपयांचे अत्याधुनिक मशीन तांत्रिकदृष्ट्या बंद पाडण्याचे प्रयत्न केले जाण्याची भीती आहे. सीपीआर रुग्णालयात सध्या डायलिसिस उपचार मोफत आहेत. पण काही वर्षांपूर्वी अशी सुविधा नव्हती तेव्हा प्राचार्य सोळंकी यांनी त्यांच्या डायलिसिस उपचारासाठी खरेदी केलेले मशीन नंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सीपीआर रुग्णालयाला भेट म्हणून दिले होते.

पण दुर्दैवाने हे मशीन कार्यान्वित केले गेले नाही. शेवटी ते गंज चढून निकामी झाले. सध्या सीपीआरमध्ये डायलिसिस यंत्रणा उत्तम आहे आणि ती पूर्णपणे मोफत आहे. याच डायलिसिस उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हजारो रुपये घेतले जातात.वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीपीआर रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये करणार असल्याचे सांगितले होते. आता त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. शेंडा पार्क येथे सातशे बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारले जाते आहे. शासकीय पातळीवर रुग्णांना नाममात्र दरात उच्च दर्जाचे उपचार(Hospital) मिळाले तर, खाजगी रुग्णालयातून रुग्णांची होणारी लूट थांबण्यास मदत होणार आहे.

एकेकाळी सीपीआर रुग्णालय हे जिल्हा रुग्णालय म्हणून कार्यरत होते किंबहुना आजही जिल्हा रुग्णालय असाच त्याचा दर्जा आहे प्रत्यक्षात मात्र सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील रुग्णही उपचारासाठी इथे येत असल्यामुळे या जिल्हा रुग्णालयाला प्रादेशिक रुग्णालय म्हणून ओळख मिळू लागली आहे.सीपीआर रुग्णालयातील काही विभाग बंद पाडण्यासाठी त्यांना मुद्दाम हेतूपूर्वक आजारी पाडले जात होते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दिशेने सुरू असलेली सीपीआरची वाटचाल रोखण्यासाठी प्रयत्न होतील, लोकप्रतिनिधींनी आणि सर्वसामान्य जनतेने हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सध्या राहिले पाहिजे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज,मदतीच्या दुसऱ्या हप्त्याची घोषणा, इतके कोटी रुपये मंजूर
पावसाचे सावट गडद; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा..
‘कांतारा चॅप्टर १’ चे निर्माते झाले मालामाल,