काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आकाशात काळे ढग दाटले आहेत. भारतीय हवामान (Weather)विभागाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, यंदा मॉन्सून अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाला होता आणि ऑगस्टमध्ये पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात पावसाचा जोर वाढत असून गणपती आगमनानंतर तो अधिक तीव्र होताना दिसतोय.

आज मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त राहील, असा अंदाज आहे.
मराठवाडा, कोकण आणि विदर्भासाठी हवामान(Weather) विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिक, सिंधुदुर्ग, पालघर, जालना, परभणी, भंडारा, नांदेड, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागांत पावसाचा जोर टिकून राहील.
छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, गोवा, ओडिशा, आसाम, मेघालय, राजस्थान, गुजरात, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांत 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात धरणे जवळपास भरली असून गंगापूर धरण 98 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील 12 धरणे 100 टक्के क्षमतेने भरली आहेत. गंगापूर धरणातून 3025 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उद्या आणि परवा नाशिकसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर परळी तालुक्यात रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. रिमझिम पावसामुळे रब्बी पिकांना पोषक वातावरण मिळणार असून नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा :
त्या व्हायरल व्हिडीओवर भडकली आलिया; म्हणाली ‘अत्यंत खासगी..’
कोणी एवढं गोड कसं असू शकतं?
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस;….