इचलकरंजी: गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डॉल्बी(Dolby) साऊंड व लेझर लाइटचा अतिरेकाने वापर वाढत आहे. या अनियंत्रित वापरामुळे सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याची वैद्यकीय तज्ज्ञांची चिंता आहे. याच पार्श्वभूमीवर मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी,डेंटल असोसिएशन,जी.पी. असोसिएशन यांच्यातर्फे शहरात जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले.

डॉल्बी-लेझरचा आरोग्यावर घातक परिणाम डॉल्बीच्या(Dolby) प्रचंड आवाजामुळे कानातील श्रवणेंद्रियांवर ताण येतो व अनेकांना कायमस्वरूपी बहिरेपणा येण्याचा धोका असतो. हृदयविकाराचा झटका, मज्जासंस्थेचे विकार, लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम, तरुण व वृद्धांमध्ये अनिद्रा, चिडचिडेपणा अशा समस्या वाढतात. दुसरीकडे, लेझर लाइटच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांची दृष्टी जाणे, डोळ्यांच्या पेशींना अपूरणीय इजा होणे असे दुष्परिणाम दिसून येतात. काहीवेळा हृदय बंद पडून तत्काळ मृत्यूचीही शक्यता डॉक्टरांनी अधोरेखित केली.
ही रॅली (माई) टी.बी. क्लिनिकपासून सुरू होऊन शिवतीर्थ, मलाबादे चौक, प्रांत कार्यालय येथे निवेदन देऊन पार पडली. संपूर्ण रॅलीदरम्यान “डॉल्बी-लेझरला बंदी घाला, आरोग्य वाचवा” असे लक्षवेधी फलक घेऊन नागरिकांनी समाजाचे लक्ष वेधले.

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अमित देशमुख यांनी केली. डॉ. एस. पी. मर्दा व डॉ. गोविंद ढवळे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून डॉल्बी व लेझरचे शरीरावर होणारे परिणाम स्पष्ट केले. याशिवाय शामसुंदर मर्दा, भगतराम छाबडा, बजरंग लोणारी यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.

या रॅलीत मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व डॉक्टर्स, डेंटल असोसिएशन, जी.पी. असोसिएशन, इचलकरंजी नागरिक मंच, रोटरी क्लब ऑफ सेन्ट्रल,रोटरी क्लब, अंधश्रद्धा निर्मूलन संघ, ज्येष्ठ नागरिक मंच,सी ए असोसिएशन, आर.एस.एस.शिवाजीनगर पोलीस स्टेशन,राष्ट्र सेवा दल, बजरंग दल, माई महिला मंडळ आदी सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
रॅलीत शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे एपीआय विजय गोडसे यांच्या नेतृत्वाखाली ५० पोलीस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते. रॅलीनंतर नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देऊन डॉल्बी व लेझरच्या वापरावर कायमस्वरूपी बंदी आणावी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
रॅलीत सहभागी सर्व संस्थांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर शहरवासीयांना आवाहन करण्यात आले की “ध्वनीप्रदूषण व प्रकाशप्रदूषणापासून स्वतःचे, कुटुंबाचे व समाजाचे आरोग्य जपण्यासाठी डॉल्बी व लेझरच्या वापराला आपणच विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा :
माता न तू वैरिणी! पोटच्या एक महिन्याच्या लेकीचा खून
३० सेंकदाची रिल जीवावर बेतली! धबधब्याच्या काठावर गेला अन्…, VIDEO VIRAL
सावधान! ‘या’ लोकांसाठी नारळ पाणी म्हणजे विषच, एकदा प्यायले तर..